माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राज्यातच
नव्हे तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आता देशाच्या राजकारणात गाजण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून तब्बल एक
हजार मराठा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. विशेष म्हणजे याबाबतचे निवेदन देखील धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर, लोकसभा
निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या निर्णय अनेक जिल्ह्यात घेण्यात आला आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाने थेट मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून मराठा
उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट स्वीकारून स्वतंत्र मराठा कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक विनायक पाटील
यांच्यासह एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, वाराणसी लोकसभा मतदारसंघातून एकाचवेळी 1 हजार मराठा
उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने ‘ईव्हीएम’वर निवडणूक घेणं शक्य होणार नाही. प्रत्यक्षात एवढे उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून
मागील काही दिवसांपासून धाराशीवबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यात लोकसभा निवडणुकीत होईल तेवढ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभं
करण्यासाठी तयारी केली जात आहे. काही जिल्ह्यात प्रत्येक गावातून एक उमेदवार अशी तयारी सुरु आहे. यासाठी लागणारा पैसे, कागदपत्रे याबाबत देखील नियोजन केले जात आहे. काही ठिकाणी वर्गणी
देखील गोळी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरणार आहे.