माय महाराष्ट्र न्यूज:बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.
पुढील ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढणीला
आलेली पीके झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला.पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rain), तर काही जिल्ह्यांना
गारपिटाचा तडाखा बसणार असा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे. मराठवाड्यासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत
सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील वातावरणात मोठा बदल झाला आहे.तापमानात घट होऊन हवेत गारवा तयार झाल्याने पावसासाठी पोषण वातावरण निर्माण झालंय.
त्यामुळे पुढील ४८ तासांत पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीत वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे.
या पावसामुळे अनेक झाडे कोसळली असून वाऱ्याच्या वेगामुळे काहींच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. दरम्यान, हवामान खात्याने गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूरला
जिल्ह्याकरिता १७ ते १९ मार्चपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.