माय महाराष्ट्र न्यूज: अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे आमदार निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी ते शरद पवारांच्या गटात
प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. अशात आता निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
यावर बोलतांना लंके यांनी खुलासा केला असून, राजीनामा देण्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, याचवेळी शरद पवार गटात जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देतांना लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे राजीनामा देणार अशा माध्यमातून आलेल्या बातम्यांचे स्वतः आमदार निलेश लंके यांनी खंडन केलं आहे. माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच
माहिती नाही अशी प्रतिक्रीया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. मला सकाळी काही लोकांचे फोन आले, त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. पण असं काहीही नाही. मला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर
तो मी माझ्या मतदारांना विचारात घेऊन घेईल असं लंके यांनी म्हंटले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
भाजपकडून अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आला नाही.
दरम्यान, निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे असे झाल्यास
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत पाहायला मिळेल.