माय महाराष्ट्र न्यूज:यंदा उन्हाळ्याचे दोन महिने कसे सरणार, या चिंतेत असलेल्या नागरिकांचे लक्ष भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आगमनाच्या घोषणेकडे आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्कायमेट’ या
खासगी संस्थेने यंदा समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचीही शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.सध्या ‘अल निनो’ सक्रिय असून, एप्रिल किंवा मेदरम्यान ही सक्रियता कमी होऊन
तटस्थ (एन्सो) स्थिती निर्माण होऊ शकते. ही स्थितीही पावसासाठी चांगली असते. त्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत ‘ला निना’ सक्रिय असेल. ‘ला निना’चा पावसाळ्याच्या उत्तरार्धात अधिक प्रभाव वाढेल, या पार्श्वभूमीवर यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल, अशी माहिती
‘स्कायमेट वेदर’चे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली. या संदर्भातील पूर्वानुमान १० एप्रिलपर्यंत केले जाईल. पण, आत्ताच्या परिस्थितीवरून पाऊस हा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पडू शकतो. हा पाऊस १०० टक्क्यांपेक्षा जास्तही असू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
इंडियन ओशन डायपोलही (आयओडी) सकारात्मक असण्याची शक्यता आहे. त्यामुळेही भारतीय मान्सूनला या स्थितीचा फायदा होऊ शकेल. संपूर्ण देशात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या ९४ टक्के पाऊस
देशात नोंदला गेला. या पावसावर ‘एल निनो’चा परिणाम झाला होता. त्यामुळे यंदाच्या पावसाकडे आणि पूर्वानुमानाकडे नागरिकांचे लक्ष आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये भारतीय हवामान विभाग यंदाच्या पावसाळ्याच्या ऋतुसाठीचे पहिले दीर्घकालीन पूर्वानुमान जारी करणार आहे.