शेवगाव/अविनाश देशमुख
जीवनात कितीही उलथापालथ झाली तरी आनंद कमी होऊ देऊ नका. कारण, सद्यस्थितीत माणूस अपसेट आहे. तो सेट होण्यासाठी कथा, कीर्तनाच्या माध्यमातून त्याच्या शरीराची सर्विसिंग करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवपुराण कथाकार प्रवक्ते श्री. समाधान महाराज शर्मा यांनी केले.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शेवगावच्या खंडोबानगर मैदानावर आयोजित महा शिवपुराण कथेचे ५वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कथा सुरू होण्याआधी शेवगाव शहर व पंचक्रोशीत जोरदार पाऊस झाला. मात्र, श्रोत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.तर, पर्जन्य राजाचे वर्णन करतांना श्री. शर्मा महाराजांनी महादेवाची कथा ऐकायला साक्षात गंगा आल्याचे सांगितले.
श्री. शर्मा महाराज पुढे म्हणाले, सर्कस मधील कलाकारांना प्रेक्षकाच्या आनंदासाठी स्वतःची सुखदुःखे बाजूला ठेवून कसरती कराव्या लागतात. तद्वतच अध्यात्म क्षेत्रातील कथा, कीर्तनकारांनाही आपले दुःख बाजूला ठेवून समाजातील अवगुण दूर करण्यासाठी समाज प्रबोधन करावे लागते. गुरु तपासायचा नसतो तर, गुरु प्राप्तीसाठी ईश्वरावर निष्ठा ठेवावी लागते, असे सांगून त्यांनी जीवनात तुम्ही एकटे असू द्या पण, तुमच्या सोबत गुरु असल्यास काहीही कमी पडत नाही, असे श्री. शर्मा महाराज म्हणाले. उमा व कैलास संहिता कथेची श्रृंखला गुंफताना त्यांनी महिलांनी पतिव्रता धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले.
कथा श्रवण करण्यासाठी व्यासपीठावर तारकेश्वर गडाचे महंत श्री.आदिनाथ महाराज शास्त्री, विदर्भरत्न श्री. संजय महाराज पाचपोर, नेवासा येथील पैस खांब देवस्थानचे श्री. देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, नूतन देशमुख, सौ. राजश्रीताई घुले, आमदार आशुतोष काळे, सौ. चैताली काळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवपार्वती कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. श्री. आदिनाथ शास्त्री महाराज,श्री. म्हस्के महाराज व श्री. पाचपोर महाराज यांनी कथेच्या नेटक्या नियोजनाचे कौतुक करून घुले परिवाराला आशीर्वाद दिले. त्यानंतर विशेष निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाली.
भाविकांची चोख व्यवस्था…
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कथा उत्सव कमिटीच्या कार्यकर्त्यांनी श्रोत्यांची पावसात गैरसोय होऊ नये म्हणून तातडीची दोन हजार भाविकांसाठी चिखलात खुर्ची आसन व्यवस्था चोख ठेवली.