नेवासा/प्रतिनिधी
कुकाणा येथील सामाजिक कार्यकर्ते व नेवासा व्हिजनचे अध्यक्ष मुकुंद अभंग यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून नेवासा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
खा.कोल्हे हे दि.२७ रोजी नगरच्या दौऱ्यावर आले असता श्री.मुकुंद अभंग यांनी त्यांची यांची भेट घेऊन उमेदवारी मागणी पत्र दिले. या मागणी पत्रात श्री.अभंग यांनी म्हंटले आहे की, मी आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांच्या तत्कालीन एस काँग्रेसमध्ये धुळे शहर कार्यकारिणी सदस्य व भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस धुळे शहर तालुका सरचिटणीस म्हणून काम केलेले आहे. तसेच राष्ट्र सेवा दलात वेगवेगळ्या उपक्रमात सक्रिय सहभाग, कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या समवेत खानदेशात अंधश्रध्दा निर्मुलन शिबीरे, व्याख्याने यामध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. अखिल भारतीय युवक बिरादरी मुंबई च्या माध्यमातून एक सुर एक ताल यासारखे वेगवेगळे उपक्रमात महाराष्ट्रात व धुळे जिल्ह्यात युवक युवतींसाठी राबविले आहे. दांडी यात्रा बा से (पुणे) बापू (दिल्ली) सायकल यात्रेत सहभाग. पर्यावरण संवर्धन संदेश हा हेतू होता. ही सायकल यात्रा दिल्लीत पोहोचली त्यावेळेस देशाच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा खून झाला होता. युवक बिरादरी व यशवंतराव चव्हाण युवा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देशात वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात तसेच एड्स निर्मुलन शिबीरामध्ये सक्रिय सहभाग. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या यशवंतराव चव्हाण युवा प्रबोधिनीच्या माध्यमातून युवा कार्यशाळा, युवा छाविणी शिबीरे अशा वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग राहिला आहे. धुळे येथे गिरणी कामगार म्हणून बदली कामगारांसाठी कायद्याची लढाई लढून ३५० स्त्री-पुरूषांना कायम करण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून योगदान दिले आहे. अखिल भारतीय युवक बिरादरी मुंबई च्या माध्यमातून रक्तदान चळवळ राबविणे, रक्तदात्यांची रक्तसुची तयार करणे तसेच आत्तापर्यंत मी ११ वेळेस रक्तदान केले आहे. सिव्हील हॉस्पिटल धुळे येथे दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ ते पहाटे ३ वा. पर्यंत रक्तदान शिबीरे आयोजित केली होती. युवक बिरादरीच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये एक सूर एक ताल सारखे उपक्रम राबविले आहे. युवक बिरादरीचे विश्वस्त कै. मोहन धारिया, कै. विलासराव देशमुख, कै. गोविंदराव आदिक, कॉम्रेड कै. शरद पाटील, सहकार महर्षी कै.पि.के. अण्णा, अभिनेता कै. फारूक शेख, कै. बापूसाहेब काळदाते, कै. बासु भट्टाचार्य, कै. दादासाहेब रूपवते, कै. मधुकरराव चौधरी, कै. प्रमोद नवलकर तसेच प्रतिमा जोशी, अमोल पार्लेकर, जब्बार पटेल, जया बच्चन, संगितकार भुपेन हजारिका, तत्कालीन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अजितदादा पवार, राजवर्धन कदमबांडे, शरद पाटील, के.सी. पाडवी, युवक बिरादरीचे अध्यक्ष क्रांती शहा, कार्याध्यक्ष कुमार केतकर गांधी सिनेमा अभिनेत्री रोहिणी हटंगडी इ. नामांकित
व्यक्तींचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहभाग लाभला आहे. नर्मदा सरोवर मुळे विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आदरणीय मेधाताई पाटकर यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग राहिला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचा न्याय हक्कासाठी मोर्चात सक्रिय सहभाग या कालावधीत आदिवासींसाठी जेवणाची भूख भागविण्यासाठी मसाले भाताची पुर्तता करणे त्यांना बसस्टँडपर्यंत पोहोच करणे, मणिबेली येथे मेधाताई पाटकर समवेत पाण्याच्या प्रवाहामध्ये उपोषणात सहभाग या अनुशंगाने भुमीगत पत्रकारांना सहकार्य करणे तसेच वेगवेगळ्या बैठकीत सहभाग राहिला आहे. या कालावधीत पत्रकारितेचे सर्व अंग शिकण्यास मिळाले. पुढे ते सामाजिक कार्यास खूप उपयुक्त ठरले.
१९९३ साली कापड गिरणी बंद झाल्यामुळे १९९३ ते आजपर्यंत नेवासा विधानसभा मतदार संघात कुकाणा या गावी वडीलोपार्जित शेती व्यवसाय करत आहे. या कालावधीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य उपक्रमात सहभाग राहिला असून या अनुषंगाने गेल्या ६४ वर्षात नेवासा विकास अनुशेषाबाबत तहसिल कचेरीसमोर उपोषणे व घंटानाद इ. उपक्रमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.
१) दिल्ली मुंबई कोरिडॉर मध्ये नेवासा औद्योगिक क्षेत्राचा समावेश होण्यासाठी एक दिवशीय उपोषण
२) नेवासा तालुक्यात मराठी भाषा विद्यापीठ होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न तसेच एक दिवशीय तहसिल कचेरी समोर उपोषण
३) तालुक्यातील पाटपाण्या संदर्भात संबंधित विभागास पत्रव्यवहार
४) तालुक्यातील युवक युवतींसाठी निबंध स्पर्धा, चर्चासत्र, सामाजिक विषयावर व्याख्याने आयोजित केले आहेत.
५) तालुक्यातील आरोग्य शिबीरामध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे.
६) शेतकरी संघटनेच्या विविध उपक्रमात नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री. अंबादास कोरडे व संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी यांचे समवेत सहभाग राहिला आहे.
नेवासा तालुक्यात ७ गट जिल्हा परिषद, पंचायत समिती १४ गण आहेत. नेवासा नगर पंचायतीचे १७ वॉर्ड आहे. नेवासा मतदार संघाची लोकसंख्या २,७९,४४६ असून ६७% अल्पसंख्यांक मतदान आहे. माझा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असून प्रस्तापितांच्या विरोधात तालुक्यातील मतदार कायम प्रभावी राहिला आहे. नेवासा औद्योगिक क्षेत्र गेल्या २६ वर्षापासून कागदावरच आहे. नेवासा परिसर विकास समितीला ५/५/१९९८ रोजी मंजुरी मिळाली. गेल्या २६ वर्षात नेवासा पर्यटन शुन्य आहे. मुळा गोदावरी खोऱ्याला पश्चिमेकडील पाण्याचे गाजर गेल्या १० वर्षात दाखविण्यात आले आहे. नेवासा येथील प्रस्थावित मराठी भाषेचे विद्यापीठ तत्कालीन फडणवीस सरकारने हायजॅक केले. तालुक्यात दरवर्षी ३ हजार युवक युवती उच्च शिक्षण घेवून सुशिक्षित बेकार होत आहेत. अशा अनेक बाबींचा अनुशेष नेवासा विधानसभा मतदार संघात आहे. गेल्या सहा महिन्यापासून नेवासा विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी करण्याच्या हेतूने तालुक्यात प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर संपर्क चालू आहे. माझ्यावर समाजवादी व पुरोगामी विचारांचा पगडा असल्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मला नेवासा विधानसभा मतदार संघाकरीता उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी मुकूंद अभंग यांनी केली आहे.