माय महाराष्ट्र न्यूज:सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. म्हणजेच अनुदान वाटपाचा अजून एक नवीन मुहूर्त शेतकऱ्यांसमोर पेश करण्यात आला आहे.
त्यामुळे तारीख पे तारीखचा सिलसिला कधी संपणार, हा प्रश्न मागच्या दोन महिन्यांपासून शेतकरी उपस्थित करत आहेत.राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी सोयाबीन कापूस अनुदानासाठी ४ हजार १९२ कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली. सोयाबीन
कापूस अनुदानाचा शासन निर्णय २९ जुलै रोजी प्रसिद्ध केला. त्याचदिवशी अनुदानाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. “महायती सरकारने आपला शब्द पाळला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने पैसे जमा करण्यात येणार आहे.
असं म्हणत मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुकही केले होते. आता त्या कौतुकाला २९ सप्टेंबर रोजी दोन महीने पूर्ण होणार आहे. पण अद्यापही शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही.तारीख पे तारीख खेळ इथेच संपला नाही. कृषिमंत्र्यांनी १७ दिवस अनुदानावर मौन बाळगलं आणि १९ सप्टेंबर
रोजी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊन २६ सप्टेंबरचा मुहूर्त ठरवला. त्यावेळी तर पत्रकार परिषद घेऊन मुंडे यांनी नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी अनुदान वाटप करण्याचं जाहीर केलं. “२६ सप्टेंबर रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अनुदानाचं वाटप वाशिम जिल्ह्यात करण्याचं नियोजित आहे.
असं मुंडे यांनी सांगितलं. पण मोदींचा वाशिम दौरा रद्द झाल्याची बातमी आली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी ओतलं गेलं. त्यानंतर राज्य सरकारनं पुन्हा एकदा सोयाबीन कापूस अनुदानासाठी नवीन मुहूर्त शोधला. आणि तो मुहूर्त आहे, २९ सप्टेंबरचा.आता पंतप्रधानांच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील
शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात सोयाबीन कापूस अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं ‘तारीख पे तारीख’चा सिलसिला अजूनही थांबलेला नाही. आता २९ सप्टेंबरपासून अनुदानचं वाटप सुरू होणार आहे.