Monday, May 27, 2024

शरद पवारांच्या त्या विधानांवर सुजय विखेंकडून जोरदार उत्तर

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला, मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने काय केले?’ असा सवाल करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुरीतील सभेत टीका केली होती. त्यांच्या या टीकेला

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना पाच तास लागतील.’ असा टोला डॉ. विखे यांनी लगावला आहे.अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास

आघाडीचे नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून पुन्हा पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पवार आणि विखे यांच्यात जुनाच राजकीय संघर्ष आहे. या निवडणुकीत त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळत आहे. पवार यांनी

या मतदारसंघात व्यक्तीश: लक्ष घातले आहे. आतार्यंत ते तीन वेळा मतदारसंघात येऊन गेले. आणखी तीन सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. सभेत बोलताना राष्ट्रीय मुद्यांसोबतच पवार विखे पाटील यांच्यावर टीका करतात. राहुरीच्या सभेतही त्यांनी विखे पाटील यांच्या परिवारावर टीका केली होती.

त्यावरून आता डॉ. विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील एका मेळाव्यात बोलताना पवार यांना उत्तर दिले आहे. डॉ. विखे पाटील म्हणाले, या निवडणुकीत निम्मे काम जेष्ठ नेत्यांनी करून टाकले आहे. आता उरलेले निम्मे काम १३ मे रोजी मतदार संघातील जनता करेल. शरद पवारांच्या पक्षाला उमेदवार आयात करावा लागला.

हा उमेदवार कसा आहे? हे पारनेरच्या जनतेला चांगले माहिती आहे. मात्र, पारनेरच्या जनतेला २०१९ मध्ये केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा लेखाजोगा मतदारांपुढे आहे. जे केले तेच आपण सांगतो. या मतदारसंघातील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे.

लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि नगरचा खासदारही महायुतीचाच असेल, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!