Sunday, October 6, 2024

शिरसगाव येथे नोंदित बांधकाम मजुरांची आरोग्य तपासणी

नेवासा

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे नोंदित बांधकाम मजुरांसाठी आरोग्य तपासणी ते उपचार या योजनेअंतर्गत बांधकाम मजुरांची तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले.

समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते
या शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना विठ्ठलराव लंघे म्हणाले की, बांधकाम कामगार समाजातील अतिशय उपेक्षित घटक आहे. तुटपुंज्या रोजंदारीवर काम करून तो आपल्या कुटुंबाची उपजीविका कशीबशी भागवतो. त्यानंतर जर कुटुंबावर एखाद्या आजारपणाचे संकट ओढावले तर त्या मजुराची पूर्ण आर्थिक घडी दोन वर्षासाठी कोलमडते, तो कर्जबाजारी होतो. या पार्श्वभूमीवर ही योजना चालू झाल्याबद्दल शासनाचे जाहीर आभार त्यांनी मानले.

डॉ. करणसिंह घुले यांनी योजनेबद्दल सविस्तर माहिती देताना आरोग्य तपासणी, हेल्थ कार्ड व उपचार करण्याची कार्यपद्धती उपस्थित कामगारांना समजावुन सांगितली. बांधकाम मजुरांच्या कुटुंबीयांना आरोग्यासाठी एक रुपयाही खर्च लागू नये हा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण नेवासा तालुक्यातील नोंदीत बांधकाम मजुरांसाठी नेवासा फाटा येथील साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे बाह्य रुग्ण व अंतर रुग्ण विभागाची सोय केलेली आहे. याचा कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी सुनील वाघमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भारतीय मजदूत संघाचे कृष्णा साठे, राजेंद्र पोटे, नवनाथ देशमुख, अरुण देशमुख, शिवसेना वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे सचिन काळे, तपासणी अधिकारी डॉक्टर घोगरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी गणेश लंघे यांनी विशेष कष्ट घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूसाहेब देशमुख यांनी केले तर आभार दादासाहेब नाबदे यांनी मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!