रांजनगावदेवी/आदेश जावळे
शेतकरी मित्रांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील रांजणगाव-नागापूर शिवारात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील रांजणगाव-नागापूर शिवारात पाटाच्या लगत वस्ती असणारे बाबासाहेब कापसे यांच्या शेतात काल रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेला कोल्हा पडला. विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे व विहिरीचे कठडे उंच असल्या कारणाने कोल्ह्याला विहिरी बाहेर पडणे अवघड होऊन बसले होते. कोल्ह्याने रात्रभर पोहून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला बाहेर येण्यात यश आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता बाबासाहेब कापसे आपल्या शेतात पंप चालू करण्यासाठी गेले असता कोल्ह्याच्या ओरडण्याचा त्यांना आवाज आला .
त्यांनी लगेच विहिरीत डोकावून पाहिल्यावर त्यांच्या नजरेस कोल्हा पडला. सदर घटनेची माहिती त्यांनी आपल्या मित्राला कळवली मग नामदेव चौधरी ,आबासाहेब कापसे ,धीरज चौधरी शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले. या तरुण शेतकरी मित्रांनी दोरीच्या साह्याने फासा टाकून कोल्ह्याला बाहेर काढले. विहिरीतून बाहेर पडताच नर जातीच्या कोल्ह्याने जोरात उसाच्या शेतात धूम ठोकली. कोल्ह्याला यशस्वीरित्या बाहेर काढल्यामुळे शेतकरी मित्रांनी समाधान व्यक्त केले.
रांजणगाव नागापूर भानसहिवरा परिसरात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोल्ह्यांसाठी चांगला निवारा आहे .त्यामुळे या परिसरात नेहमी कोल्हे असल्याचे शेतकऱ्याच्या नजरेस पडते असे नामदेव चौधरी या शेतकऱ्याने सांगितले.