माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सगळीकडं चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान
यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते अहिल्यानगरमध्ये आहेत. अकोले येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं.
सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातचं देण्याचं ठरवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. राज्य सरकारनं ‘लाडकी बहीण योजने’चे जुलै,
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात वितरीत केले आहेत. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे पैसे ‘येत्या आठ दिवसात’ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे आली असताना शहरातील बाजारतळावर झालेल्या जाहीर सभेत पवारांनी अकोले मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण लहामटे हेच पुन्हा घड्याळाच्या चिन्हावर
निवडणूक लढवतील, असं जाहीर केल्यानं मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं या मतदारसंघातून दावेदार असलेले भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड हे आता हाती तुतारी घेतील, असं दिसून येतंय. वैभव पिचड यांनी हाती
तुतारी घेतली तर शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले अमित भांगरेंना पुन्हा डावललं जाणार का? हा प्रश्न निर्माण झाला.