माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या फ्रॉड कॉलच्या घटनांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांवर आता कठोर नियम लादण्यात आले आहेत.
फसवणूक आणि स्पॅम कॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्याच्या दिशने केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, कंपन्यांना एकाच वेळी जास्त सिमकार्ड खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, फेक कॉल करणाऱ्या कंपन्यांनाही कारवाईची तलवार उगारली आहे.सध्या देशभरात फसवणूक कॉलचा धुमाकुळ सुरू आहे. या कॉलद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढतच आहेत. यावर नियंत्रण मिळावे यासाठी दूरसंचार विभाग सतत
प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कंपन्यांना एकाच वेळी १०० पेक्षा जास्त सिमकार्ड खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.जर एखाद्या कंपनीला १०० पेक्षा जास्त सिमकार्डची गरज असेल तर त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना अर्ज करावा लागेल.
तसेच, प्रत्येक १०० सिमकार्डसाठी ई-वेरिफिकेशनही करावे लागणार आहे.या नव्या नियमामुळे कंपन्यांना एकाच वेळी जास्त सिमकार्ड खरेदी करण्यावर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे फसवणूक कॉलचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय,
प्रत्येक कर्मचाऱ्याचे ई-केवाईसी करणे आवश्यक असल्याने सिमकार्ड दुरुपयोग होण्याच्या शक्यता कमी होतील.दरम्यान, ट्रायनेही फेक आणि स्पॅम कॉलवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने ट्रायने कठोर भूमिका घेतली आहे.
नव्या नियमानुसार, फेक कॉल झाल्यास त्यासाठी संबंधित दूरसंचार कंपनी जबाबदार ठरणार आहे. यामुळे कंपन्यांनाही यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.या नव्या नियमामुळे ग्राहकांना फसवणूक करणाऱ्या कॉल्सपासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
तसेच, कंपन्यांनाही सिमकार्डच्या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.