Thursday, November 7, 2024

माहूरच्या रेणुकाची प्रतिकृति नजिक चिंचोलीची खडेश्वरीदेवी

नेवासा/सुखदेव फुलारी

माहूरच्या रेणुकादेवीची  प्रतिकृति असलेली नजिक चिंचोलीची खडेश्वरी देवीची नवरात्रोत्सव सातव्या माळीनिमित्त बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी यात्रा आहे. माहूरची रेणुका देवी व त्या शेजारीच तुळजापूरची तुळजाभवानी असे दोन शक्ती पीठे एकत्रित असे हे अलौकिक व दुर्लभ शक्ती पीठ आहे.

नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली गावचे उत्तरेला एका उंच टेकडीवर जगदंबा देवीचे मंदिर आहे.या देवीचे नाव खडेश्वरी देवी असे पण आहे.उंच टेकडीवर असल्याने व सभोवताली घनदाट वृक्षवल्ली असल्याने मंदिर परिसर रमणीय आहे.दरवर्षी नवरात्रामध्ये मोठा उत्सव होऊन हरिनाम सप्ताह ही होत असतो.माहूरची रेणुका देवी व त्या शेजारीच तुळजापूरची तुळजाभवानी असे दोन शक्ती पीठे एकत्रित असलेले हे अलौकिक व दुर्लभ शक्ती पीठ आहे.
या खडेश्वरी मंदिरात गणेशानंदजी महाराज यांचे येण्याने मंदिर व परिसराचा कायापालट झालेला आहे.श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे मठाधिपती भास्करगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली गणेशानंद महाराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून मंदिर परिसरात झाडे लावली.पूर्वीचे दगड मातीचे जुने मंदिर नवीन बांधकाम करून पक्के करण्यात आले.मंदिर परिसर विकासासाठी काही भक्तांनी आपल्या जमिनीही दिल्या. प्रवचनकार,प्रबोधनकार यांचे माध्यमातून हरिनामाचा व विचारांचा अखंड जागर सुरू असतो. गावतील मतभेद मिटविणे,विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी खडेश्वरी देवीवरील ग्रामस्थांची अपार श्रद्धा कामी येते. मंदिर परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेग वेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.

खडेश्वरी देवस्थानचे प्रमुख महंत गणेशानंदगिरीजी महाराज तसेच  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नजीक चिंचोली येथील खडेश्वरी देवी मंदिर प्रांगणात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या कृपा आशिर्वादाने व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे.
नवरात्र उत्सव सोहळयात पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते १०.३० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, १०.३० ते ११ महाआरती,दुपारी ११ ते १२ फराळ पंगत,सायंकाळी ५.३० ते ६ महाआरती,सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत किर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होत आहे.रात्री होणाऱ्या किर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी सातव्या माळेला जगदंबा श्रीखडेश्वरी मंदिर प्रांगणात भरणाऱ्या यात्रेचे नियोजन ग्रामपंचायत नजीक चिचोंली यांनी केले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या दुकानदारांना जागेची व्यवस्था मंदिर परिसर स्वच्छता अभियान आदी उपक्रम हाती घेतले आहे. दुपारच्या सत्रात व रात्रीच्या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या  भाविकांसाठी  शाबुदाणा खिचडी व केळी प्रसादाचे वाटप केले जात आहे.शारदीय नवरात्र उत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा किर्तन महोत्सव यशस्वी होण्यासाठी येथील भक्त मंडळ सेवेकरी तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ अधिक प्रयत्न करत आहे.
भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा खडेश्वरी देवस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री गणेशानंदगिरीजी महाराज, खडेश्वरी मंदिर देवस्थानचे सर्व विश्वस्त ग्रामस्थ व परीसरातील भक्त मडंळ यांनी केले आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!