नेवासा
नेवासा तालुक्यासाठी शंकरराव गडाख यांनी जो निधी आणला तो अडविण्याचे काम विरोधकांनी केले, परंतु आपले लढवय्ये आमदार निकराने लढले व न्यायालयात जाऊन स्थगिती उठवून आणली. आपले आमदार दमदार आहेत. शंकरराव काळजी करू नका, तालुक्यातील जनता तुमच्या सोबत असल्याने तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.
नेवासा बाजार समितीच्या १० कोटी रुपयांच्या भव्य व्यापारी संकुलाचा शुभारंभ माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या हस्ते व अड. देसाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, जेष्ठ नेते यशवंतराव गड़ाख,आ.शंकरराव गड़ाख यांचे प्रमुख उपस्थितित झाला.
माजी खासदार यशवंतराव गडाख पुढे
म्हणाले की, या व्यापारी संकुलामुळे
नेवासा शहराच्या वैभवात भर पडली आहे. याठिकाणी अनेक बँका व नवीन व्यवसाय सुरू झाल्यास मोठे आर्थिक चलन नेवासा शहरात फिरणार आहे. तालुक्यात निधी मिळू नये यासाठी विरोधकांनी काम केले. अनेक चांगल्या कामात खोडा घातला, रस्त्याच्या कामांना स्थगिती दिली हे सर्व शंकररावपेक्षा तालुक्याने जास्त सहन केले पण आपले दमदार आमदार कामाच्या स्थगिती उठविण्यासाठी न्यायालयात गेले त्यामुळे त्यातील अनेक कामे पुढील ३ महिन्यांत होतील.
माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले, आमदार गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने स्वनिधीतून कोट्यवधीची कामे केली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आमदार गडाख यांना राजकीय उलथापालथीमध्ये अनेक आमिषे आली पण ते याला बळी पडले नाही व तालुक्याचा स्वाभिमान त्यांनी जिवंत ठेवला.
माजी मंत्री आ.शंकरराव गडाख म्हणाले, २० वर्षांपूर्वीची बाजार समिती व आताची बाजार समिती यात खूप फरक आहे. कुकाणा, घोडेगाव, नेवासा येथे स्व भांडवलातून मोठी कामे उभी राहिली आहेत. व्यापार संकुलाचा शहरातील व्यापारी व युवकांनी लाभ घ्यावा व व्यवसाय सुरू करावेत. काही अडचणी आल्या तर मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. मंत्रिपदाच्या काळात करोना असतानाही आपण अनेक कामे मंजूर केली परंतु गेल्या ३ वर्षांत निधी मिळाला नाही पण शहरात बऱ्यापैकी कामे झाली. १८ ते १९ ठिकाणी सभामंडप झाले. दुसरीही कामे झाली. २००९ ते २०१४ या काळात ज्ञानेश्वर मंदिरासाठी तुमच्या सहकार्याने आपण मोठा निधी आणला होता. भावी काळातही नेवासा तालुक्याचे विकासाचे स्वप्न साकार करू.
बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. देसाई आबा देशमुख, कारभारी जावळे, महेश मापारी यांनी मनोगत व्यक्त केले.