माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मान्सूनच्या पावसाने माघार घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कारण पूर्वेकडून वाहणारे वारे यावेळी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात आर्द्रता, किमान आणि कमाल
तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ऋतुचक्रावर परिणाम होत असून पावसाचे ढग दाट होत आहेत. मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होऊन प्रचंड उकाडा जाणवू लागला होता. मात्र, गेल्या
दोन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. आजही राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड तसेच पालघर जिल्ह्यात आज रविवारपासून पुढील ४८ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातही पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार, अशा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
सध्या अरबी समुद्रातील महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.पुढील काही तासांत ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहील, तसेच
घाटमाथ्यावरही तुफान पावसाची शक्यता आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे.त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. सध्या मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पाऊस
असे वातावरण सध्या आहे. दुसरीकडे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही रविवारी अधून मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ तसेच चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा
अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.