माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत
भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे, या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन ते कधीच सत्तेत येऊ शकत नाहीत
असा इशाराही मनोज जरांगे यानी दिला आहे. सभेला तुम्ही एकजूट दाखवली आता मतदानाला ताकद दाखवा, मराठ्यांचं शंभर टक्के मतदान झालं पाहिजे, माता-माऊलींसह, पुरुष, विद्यार्थी सर्वांनी मतदान करा, एकही
मत वाया जाता कामा नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. शेवटी अस्तित्वाची लढाई आपल्या मुलांसाठी आहे, आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे, असंही जरागे पाटील यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मुलांचं आयुष्य बेचिराख
करण्याचं काम केलं आहे. मराठा मुलांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं पाहिजे अशा पद्धतीने सरकारने प्रयत्न केला आहे. ज्या मराठा समाजाने त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी सत्तेचा वापर फडणवीस
यांनी केला आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय.सरकार आपल्या लेकरांना शंभर टक्के आरक्षण देईल, मराठ्यांच्या लेकाराचे मुडदे पाडून कधीच पापाचा वाटेकरी हे सरकार होणार नाही ही जी आम्हाला आशा होती, ती आशा सरकारने स्वत:हून संपवली.
आंदोलन आणि मराठा समाज एकत्र ठेवायचं नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं नाही, मराठा समाज मोठा झाला तर आपलं काय होईल, मराठ्यांच्या मुलाला नोकऱ्या, शिक्षण मिळवू द्यायचं नाही. मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे हे वचन फडणवीस
यांनी उचललं होतं. मराठ्यांच्या विरोधात फडणवी वागले आणि त्यांची चाल त्यांनी यशस्वी केली, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. सत्ता त्यांच्या हातात होती, पण त्यांनी निर्णय घेतला नाही, आमच्या शेपटावर पाय ठेवला. आमच्या नाकावर टिचून ओबीसीत
सतरा जातींचा समावेश केला, पण आम्हाला आरक्षण दिलं नाही, ही खून्नस त्याच दिवशी मराठ्यांना कळली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेवू आणि सत्तेत बसू हे त्यांनी त्याच दिवशी ठरवलं होतं. हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं असा हल्लाबोलही जरांगे पाटील यांनी केला.