माय महाराष्ट्र न्यूज:राज्याच्या काही भागांमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. तर, काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. अशावेळी ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण
निर्माण झाल्याने दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत आहे. अशातच आज (15 ऑक्टोबर 2024) राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे जाताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा
अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर,
सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पुणे आणि घाट परिसरातही हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.