माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर तीन दिवसात
म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.अर्थातच 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होण्याआधीच राज्यात नवीन सरकार येणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून उभे असलेले तत्कालीन खासदार सुजय विखे यांचा निलेश लंके यांनी पराभव केला होता.
खासदारकीची संधी गमावलेल्या डॉक्टर सुजय विखे हे विधानसभेची निवडणूक लढवणार अशी खात्री होती. परंतु नव्याने हाती येत असलेल्या माहितीनुसार ते ही निवडणूक लढणार नाहीत.अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून
माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. पक्षाकडे सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली होती.पण पक्षाकडून सुजय यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार नाही, अशी माहीती आहे. ती जागा
महायुतीत शिवसेनेकडे असल्याने उमेदवार कोण याची चर्चा सुरु आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात सुजय विखे यांनी लढण्याची तयारी केली होती. मात्र एकाच घरात 2 तिकीट नको म्हणत पक्षाने निर्णय घेतल्याची माहिती आहे.
माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोर्वे (ता. संगमनेर) येथील जाहीर सभेत ‘त्यांना ३५ वर्षे सत्ता दिली. मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा,’ असे वक्तव्य केले होते. त्यावरुन त्यांची तयारी दिसून येत होती. मात्र पक्षाने आता विखेंना उमेदवारी न देण्याचा विचार केल्याची माहिती आहे.
सुजय विखेंच्या या विधानावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना विचारले असता, त्यांनी सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम आहे. जो काही निर्णय घेतला असेल, त्या निर्णयासमवेत आपण आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.