माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा वीरभद्र देवस्थानच्या यात्रा उत्सवा निमित्त काल, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तुकाराम बाळाजी भगत यांनी वर्षभराची
भविष्यवाणी (होईक) व्यक्त केली. या भविष्यवाणीतून राज्यात सत्ता बदल होण्याचे संकेत दिले, मात्र राजकीय परिस्थिती गोंधळाची निर्माण होणार असल्याचे देखील त्यांनी आपल्या भविष्यवाणीतून व्यक्त केले आहे.भगत होईक सांगताना म्हणाले, राज्यात
भरपूर पाऊस होऊन काही ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होईल. गहू, हरभरा या पिकाला चांगला भाव मिळेल. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी धरणी हादरणार असल्याचे सांगत भूकंप होण्याचे संकेत यावेळी देण्यात आले आहेत. जगाच्या पाठीवर काही ठिकाणी
युध्दसदृश परिस्थिती निर्माण होऊन रक्ताचे पाठ वाहतील, असेही भाकीत भगत यांनी आपल्या पुढील वर्षभराच्या भविष्यवाणीतून व्यक्त केले आहे. दरवर्षी तुकाराम भगत यांची राजा विरभद्र यात्रा उत्सवानिमित्त भविष्यवाणी ऐकण्यासाठी हजारो लोक मिरीमध्ये
आवर्जून उपस्थित राहतात. यावर्षीचा होईकाचा कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला. त्यानंतर सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा सुरू झाला. यावर्षी यात्रा कमिटी व मिरी ग्रामस्थ यांच्यावतीने अतिशय सुसज्ज नियोजन करण्यात आले होते. यात्रा उत्सवं अगदी
शांततेत व मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये पार पडला दरम्यान, मिरी येथील होईकामध्ये भगत यांनी व्यक्त केलेली भविष्यवाणी भाविक भक्तांच्या दृष्टिकोनातून खरी मानली जाते, त्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला मोठे महत्त्व आहे. शेतकऱ्याच्या पीक पाण्याबरोबरच जगातील घडामोडींबद्दल देखील त्यांनी
भविष्यवाणी व्यक्त केली. त्याचबरोबर राज्यात सत्ता बदलाचे देखील संकेत त्यांनी देत राज्यात गोंधळ निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यात नेमका काय गोंधळ उडणार याची मोठी उत्सुकता या भविष्यवाणीतून निर्माण झाली आहे.