माय महाराष्ट्र न्यूज:- आठ महिन्यांपूर्वी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना करणारे माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या
उपस्थितीत कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला पाठिंबा देत पुन्हा एनडीएसोबत गेले. मात्र त्यांच्या या निर्णयाला
विरोध करत जेडीयू पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. कपिल पाटील हे शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते. त्याशिवाय ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव होते. नितीश कुमारांच्या
निर्णयामुळे ते नाराज झाले होते.काँग्रेस पक्षप्रवेशानंतर कपिल पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. देशात फॅसिझमविरोधात आमची लढाई आहे.
या लढाईत राहुल गांधी भारत जोडो माध्यमातून लढत आहेत. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. हा प्रवेश कुठल्याही हेतूने अथवा विधानसभा मतदारसंघातील तिकीटासाठी झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केले. मात्र ऐन विधानसभा
निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांचा काँग्रेसमधील पक्षप्रवेश महत्त्वाचा वाटतो. गोरेगाव किंवा वर्सोवा मतदारसंघातून कपिल पाटील यांना महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकते अशी चर्चा आहे.
कोण आहेत कपिल पाटील?:लोकभारतीच्या माध्यमातून कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते. समाजवादी विचारसरणी, शिक्षकांसाठी भांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २००६ साली पहिल्यांदा त्यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघात
विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी माघार घेतली होती. कपिल पाटील हे नेहमी पुरोगामी चळवळीशी जोडलेले नेते आहेत. लोकभारती या संघटनेतून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले आहेत.