नेवासा(तालुका प्रतिनिधी):– नेवासा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे हे ९५ हजार ४४४ मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शंकरराव गडाख यांचा ४०२१ मताचे फरकाने पराभव केला आहे.
२२१ नेवासा विधानसभे करिता दि.२० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत
२ लाख २६ हजार २९ मतदान झाले होते.
शनिवारी दि.२३ नोव्हेंबर रोजी मुकींदपूर येथील शासकीय गोडावून मध्ये मतमोजणी झाली.
सकाळी ७ वाजता मतमोजणी निरीक्षक जे.एल.बी.हरिप्रिया, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत स्ट्रॉंग रूमचे सील तोडून ईव्हीएम मशीन (मतपेट्या) बाहेर काढण्यात आल्या.
सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली.एकूण २७६ बुथची १४ टेबलावर २० फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली.
मतमोजणीच्या पहिल्या काही फे-यांपासूनचे लंघे आघाडीवर होते ते शेवटच्या फेरी अखेर आघाडीवरच राहिले.
गडाख,लंघे व मुरकुटे यांच्यामध्ये प्रचारातही चांगलीच रंगत आली होती.
गडाख यांच्या करिता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, लंघे यांच्या करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.श्रीकांत शिंदे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर मुरकुटे यांच्यासाठी बच्चू कडू यांनी सभा घेतल्या होत्या. लाडकी बहीण आणि माझी शेवटची निवडणूक ही लंघेची भावनिक साद यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
—————————-
*उमेदवारांना पडलेली मते…
*221 नेवासा विधानसभा निवडणुकीत विठ्ठलराव लंघे 4021 मतांनी विजयी*
उमेदवारांना पडलेली मते अशी…
1) शंकरराव गडाख (उबाठा शिवसेना-मशाल) 91423
2) विठ्ठलराव लंघे(शिवसेना-धनुष्यबाण) 95444 *विजयी*
3)हरिभाऊ चक्रनारायण(बसपा-हत्ती) 805
4) पोपट सरोदे(-वंचित-गॅस सिलेंडर) 663
5) बाळासाहेब मुरकुटे (प्रहार-बॅट) 35331
6) कांबळे लक्ष्मण(अपक्ष-कपाट) 229
7) जगन्नाथ कोरडे (अपक्ष-बॅटरीटॉर्च) 433
8) मुकुंद अभंग(अपक्ष-ग्रामोफोन) 148
9) वसंत कांगुणे(अपक्ष-चिमणी) 194
10) शरद माघाडे(अपक्ष-ट्रम्पेट) 370
11) सचिन दरंदले(अपक्ष-फलंदाज) 420
12) ज्ञानदेव पाडळे(अपक्ष-सफरचंद) 545
13) नोटा 1723
———————————
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी काम पाहिले.त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय बिरादार, निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप, माध्यम समन्वयक संदीप गोसावी यांनी सहाय्य केले.पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे अब्दुल शेख ठरले विजयाचे शिल्पकार…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा एबी फॉर्म असताना देखील समजदारीची भूमिका घेत शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मतदारसंघात केलेल्या लाडक्या बहिणीच्या फॉर्म भरून घेण्याचे काम व अल्पसंख्याक समाज,ओबीसी समाज शेख यांच्या मागे उभा राहिला व विठ्ठलराव लंघे यांच्या मागे गेल्याने लंघे याना विजय मिळवणे सोपे झाले.अजितदादा पवार यांनी नेवासात महायुतीचा आमदार निवडून आणा तुम्हाला देखील विधान परिषदेवर घेऊ असा शब्द शेख यांना दिला होता. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.अब्दुल शेख यांच्या रूपाने विधान परिषदेतून दुसरे आमदार तालुक्याला मिळते का ? याकडे आता लक्ष लागून आहे.