Monday, October 27, 2025

अहिल्यानगर मध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर दि. २३ 

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे ,आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी, सिद्धाराम सालीमठ, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा.ह.दरे, सेक्रेटरी ॲड.वि.द.आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तत्पूर्वी, ग्रंथोत्सवानिमित्त २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक) लाल टाकी रोड येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. ग्रंथदिंडीचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दैनिक प्रभातचे संपादक जयंत कुलकर्णी, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उद्योजक, वक्ता व लेखक एन. बी. धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ग्रंथ दिंडीचा समारोप राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे होणार आहे.

ग्रंथोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थी देशभक्तीपर समूहगीत गायन सादर करणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मकरंद खरवंडीकर तर प्रमुख अतिथी म्हणून दै. सकाळचे निवासी संपादक प्रकाश पाटील उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ३ वाजता ‘अभिजात मराठी भाषा एक साहित्यिक प्रवास’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे असतील. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून प्रेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावीत, दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, मसापचे शाखाध्यक्ष किशोर मरकड हे परिसंवादात सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता ‘वाचन संस्कृती आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे हे असतील. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुधाकर शेलार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख डॉ.राजेंद्र दासरी, दैनिक समाचारचे संपादक ज्ञानेश कुलकर्णी, शब्दगंध साहित्यिक परिषद, शाखा पाथर्डीचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजकुमार घुले हे परिसंवादात सहभागी होणार आहेत.

सोमवार २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निमंत्रित कवींचे ‘कविसंमेलन’ होणार आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार लहू कानडे, सिनेगीतकार व साहित्यिक बाबासाहेब सौदागर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११.३० वाजता ‘ग्रंथालये : लोकशिक्षणाची संस्कार केंद्रे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे असतील. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, साहित्यिक डॉ.बापू चंदनशिवे, दै. नवा मराठाचे संपादक सुभाष गुंदेचा, दै. दिव्य मराठीचे उपसंपादक बंडू पवार, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजच्या ग्रंथपाल संगिता निमसे परिसंवादात सहभागी होणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता ‘भारतीय ग्रंथालय चळवळीतील आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड’ या विषयावर जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक स्वप्निल तनपुरे, संजय बोरूडे , सुनिल गोसावी, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, न्यु आर्टस कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ.नवनाथ वाव्हळ हे उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ३ वाजता प्रसिद्ध हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे यांचा ‘हास्यतरंग’ हा विनोदी कवितांवर अधारित रंगतदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर हे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक जयंत येलुलकर, दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक राजेंद्र झोंड, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे हे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४ समारोप होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून अ.नगर मराठा विद्या प्रसारक समाजचे सहसचिव जयंतराव वाघ, लोकआवाजचे संपादक तथा प्रेसक्लबचे अध्यक्ष विठ्ठलराव लांडगे, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिक, ग्रंथप्रेमी, ग्रंथविक्रेते, रसिक वाचक, नागरिक यांना ग्रंथ हाताळण्याची, वाचनाची व खरेदी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात शासकीय प्रकाशने आणि विविध दर्जेदार ग्रंथ उपलब्ध होतील. तसेच प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थींचे देशभक्तीपर समुहगीत गायन, परिसंवाद, व्याख्यान, हास्यतरंग व कविसंमेलनातून दोन दिवस मनोरंजन व ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

जिल्ह्यातील रसिक नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर आणि ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!