अहिल्यानगर दि.२६
डिजिटल युगामध्ये वाचनसंस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘ग्रंथालय ऑन व्हील’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केली.
शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४’ च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकचे आयुक्त यशवंत डांगे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲङ विश्वासराव आठरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे,ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, नाशिक विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे,निरीक्षक रामदास शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले, ग्रामीण भागात आठवडे बाजारसारख्या गर्दीच्या ठिकाणी फिरते ग्रंथालय सुरू केल्यास वाचनसंस्कृतीचा प्रसार होईल. अशी दोन ‘ग्रंथालय ऑन व्हील’ सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारण्यात येणारी इमारतही सर्व सुविधांनी सुसज्ज असावी. ग्रंथालयात वाचकांसाठी अत्याधुनिक सुविधा असतील याकडे लक्ष द्यावे.
जगभरातील साहित्यिकांचे विचार वाचकांपर्यंत पोहोविचण्यासाठी आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ग्रंथोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लेखक आणि वाचकातील नाते दृढ होण्यास मदत होते. साहित्यातून विचार आणि संस्कार मिळत असल्याने ते पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी ग्रंथोत्सव, पुस्तक मेळावे, वाचक मेळाव्याचे सातत्याने आयोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. मराठी भाषेचे महत्व नागरिकांसमोर मांडण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या परिसंवादाचे सातत्याने आयोजन करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गाडेकर म्हणाले, वाचन संस्कृती टिकावी व वाढावी यासाठी शासनामार्फत ग्रंथोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गतवर्षी या ग्रंथोत्सवामध्ये राज्यात सर्वाधिक ग्रंथांची विक्री अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. जिल्ह्यात ४७४ सार्वजनिक वाचनालये असून या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील जनतेला वाचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवामध्ये शासकीय तसेच विविध प्रकाशनांच्या दर्जेदार अशा पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून जिल्हावासियांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले..
यावेळी विविध पुरस्कारप्राप्त ग्रंथालय, कार्यकर्ता, सेवक, साहित्यिक तसेच ग्रंथ वाचक निबंध स्पर्धेच्य विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. डॉ.अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले.