भेंडा/नेवासा
विद्यार्थी जीवनातील संधीचे सोने करा. शिक्षण घेत असताना तारुण्याचा व कर्तृत्वाचा विसर पडू देऊ नये.आई- वडिलांचा चेहरा ज्यांना वाचता येतो तेच यशस्वी होतात असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. काशिनाथ अण्णा नवले, अशोकराव मिसाळ, बबनराव भुसारी, प्रा. डॉ.नारायण म्हस्के, अंबादास कळमकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कवी सुमंत पुढे म्हणाले की, शिक्षणाचा उद्देश फक्त पॅकेज देणारे नसावे. नोकरी हा शिक्षणाचा पर्याय नाही. भारत हा कार्यालयीन प्रमुख देश नसून तो कृषिप्रधान देश आहे. त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शैक्षणिक वर्षातील क्रीडा, सांस्कृतिक, वाड्मयीन, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना कवी नारायण सुमंत व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
महाविद्यालयातील शिक्षक, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष डॉ. संभाजी काळे यांनी अहवाल वाचन केले. प्रा. डॉ. अशोक सागडे व प्रा. संतोष शेळके यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रा. केशव चेके यांनी आभार मानले.