शिर्डी/सुखदेव फुलारी
सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने शुक्रवारी कुटुंबासह शिर्डीत साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. साई चरणी नतमस्तक होत शिल्पाने प्रार्थना केली.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीक्षा मातोश्री सुनंदा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बहीण रिना ही देखील यावेळी उपस्थित होती. दरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने शिल्पा शेट्टी आणि संपूर्ण कुटुंबियांचा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सन्मान केला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. यावेळी शिल्पाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती.
*बाबांनी भरपूर काही दिलं…
साई दर्शनानंतर मंदिर परिसरात पत्रकारांसोबत संवाद साधतांना ती म्हणाली की, बाबांचं बोलावणं यंदा उशिरा आलं. मला आनंद आहे, मी सर्व परिवारासह येथे आले. मी जेव्हा येथे येते तेव्हा असं वाटतं परत घरी आले. मी जे काही आहे बाबांचा हात डोक्यावर असल्याने आहे. बाबांची शिकवण आचरणात आणून मी इथे आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा. बाबांवर विश्वास ठेवा ते जे करतील ते चांगल्यासाठीच करतील.आम्ही खूप प्रवास करून थकून आलो.
मात्र येथे आल्यावर थकवा दूर झाला. बाबांनी शक्ती दिली. पैशांच्या व्यतिरिक्त बाबांनी भरपूर काही दिलं. जीवनात सुख महत्त्वाचं असतं. जीवनात जितके चढ उतार बघितले माझा अंधविश्वास म्हणा किंवा दृढ विश्वास मला माहित आहे जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पा शेट्टी हिने माध्यमांशी बोलताना दिली आहे.