अहिल्यानगर, दि.१९
ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अपर जिल्ल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न्न झाली.
बैठकीस उपजिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सो.ह इंगळे वैधमापनशास्त्र विभागाचे उप नियंत्रक रमेश दराडे उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री हिंगे म्हणाले, ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक समन्वयातून व्हावी. पावसामुळे रस्त्यावर उन्मळून पडलेली झाले, विद्यूत पोल आदी तातडीने हटविण्यात यावीत. नागरिकांना विद्युत विषयक असलेल्या समस्यांची तक्रार करण्यासाठी २४x७ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित राहील, याची दक्षता घ्यावी. विद्यूत विषयक दुरुस्तीचे कामे प्राधान्याने करण्यात यावीत. नागरिकांना जारच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीबरोबरच फळे पिकवण्यासाठी रसायन वापराच्या तक्रारीच्या अनुषंगाने फळे विक्रेत्यांची तपासणी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सेतु सुविधा केंद्रातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा योग्य आहेत काय, त्यासाठी आकारला जाणारे फिस, दिली जाणारी सेवा याच्या तपासणीसाठी लवकरच अभिप्राय कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीत अहिल्यानगर शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई, प्रत्येक सेतू सुविधा केंद्राच्या दर्शनी भागात दरसूची लावणे, आरोग्यासाठी हानीकारक असलेले प्लास्टिक कप, ग्लासचा वापरावर निर्बंध व जागृती करणे, भेसळयुक्त पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई, ऊर्जामित्र बैठकीचे आयोजन, पेट्रोल पंपावर नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविणे, शासकीय दवाखान्यातून मोफत औषध पुरवठा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस विविध विषयांवरील चर्चेत अशासकीय सदस्य अतुल कुऱ्हाडे, विलास जगदाळे, प्रा. अमिता प्रीतमसिंग रानू-कोहली, दिनेश थोरात, अशोक शेवाळे, रणजित श्रीगोड, उमा मेहेत्रे, गजेंद्र क्षीरसागर, बाबासाहेब भालेराव, डॉ. कळमकर राजेंद्र पर्वती, प्रा. डॉ. मंगला भोसले, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. विलास सोनवणे, डॉ. गोरख बारहाते, प्रकाश रासकर, रभाजी सुळ यांनी सहभाग घेतला.