नेवासा
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील फार्मसी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे गढी,जिल्हा बीड येथे उद्या रविवार दि. २० जुलै रविवारी १९८६ ते ८८ कालावधीतील विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केमिस्ट असोसिएशनचे सदस्य अरविंद सरोदे (भेंडा) यांनी केले आहे.
यानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यक्रमात विद्यार्थी दशेनंतर आजपर्यंत झालेल्या जडणघडणचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील गढी येथे जय भवानी शिक्षण मंडळाचे, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज आहे. या ठिकाणी डी.फार्मसी चा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थी शिक्षण घेतात. १९८६, ८७, ८८ च्या शैक्षणिक वर्षात बीड, मुंबई, पूणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, परभणी, जालना आदी जिल्ह्यांतील १०० च्या आसपास विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाच्या तब्बल तीन दशकानंतर जवळपास ३८ वर्षांनंतर या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त जुन्या आठवणींची उजळणी होणार असल्याने, या स्नेहमेळाव्यासाठी तत्कालीन विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. एकंदरीत वेगळीच उत्सुकता दाटली असून, या कार्यक्रमाला प्राचार्यासह तत्कालीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थिती लावणार असून दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान सरोदे यांनी केले आहे.