नेवासा/प्रतिनिधी
‘डिजिटल युगातील पत्रकारिता आणि मूल्यांची पुनर्स्थापना’ या विषयावर विचारमंथन घडवून आणण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सोनई येथे शनिवार दि.१९ जुलै रोजी मीडिया संमेलन संपन्न झाले.
ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी (राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग) आणि प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे (मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, जळगाव) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी बोलताना ब्रह्मकुमार डॉ. शांतनू यांनी लोकशाहीच्या चार खांबात चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा खांब इतर तीन खांबाला गुजागर करण्याचे कार्य निरंतर करत असल्याचे सांगत कुठल्याही कार्यात पुनर्स्थापना करताना मूल्य जपणे फार आवश्यक असल्याचे सांगितले तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे कार्य १४० देशात सुरू असून सामाजिकता जोपासली जात असल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी डिजिटल सायबरच्या तंत्रज्ञानात आजही प्रिंट मीडिया विश्वासार्हता जपून असून डिजिटल पत्रकारिता म्हणजे दुधारी तलवार असल्याने त्यातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक व मूल्यांचा ठेवा जपून टाकावे असे सांगत सोशल मीडियावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने हे खूप घातक ठरत असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाला न घाबरता टेक्नो स्नेही म्हणून कार्य करीत राहावे असे सांगून त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तरे दिली.
या कार्यक्रमासाठी सोमनाथ म्हस्के, डॉ. दीपक हारके, जलमित्र सुखदेव फुलारी यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारांच्या वतीने कारभारी गरड,विनायक दरंदले,सुनील गर्जे व पत्रकारांनी मान्यवरांचा वृक्षांचे रोप देऊन सत्कार केला.
यावेळी संमेलनासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर, सोशल मीडिया, जनसंपर्क, जाहिरात क्षेत्र तसेच मीडिया शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी व नेवासा तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
सोनई ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका उषा दिदी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
पत्रकार विनायक दरंदले यांनी आभार मानले.