नेवासा/सुखदेव फुलारी
कुरेशी समाजाने व्यापार बंद केल्याने
घोडेगाव येथील जनावरांचा बाजार संकटात आला असून शेकडो व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन हिंदू-मुस्लिम व्यापाऱ्यांनी संयुक्त बैठक घेत प्रशासनाला दिले दिले.
याबाबद अधिक माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून गो-रक्षकांच्या कारवाया, अडवणूक, मारहाण आणि खोट्या आरोपांमुळे कुरेशी समाजाने संपूर्ण जिल्ह्यातील जनावरे खरेदी-विक्रीचा व्यापार बंद ठेवला आहे. या व्यापार बंदीचा थेट फटका घोडेगाव बाजाराला बसला असून, गेल्या तीन आठवड्यांपासून बाजारात कुरेशी समाजाचे व्यापारी खरेदी-विक्रीसाठी येत नाहीत. भाकड जनावरे विक्रीसाठी येत नाहीत. व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगितले.
यबाबद व्यापाऱ्यांनी सांगितले की, अनेक प्रकरणांत गो-रक्षक संघटनांच्या नावाने काही मंडळी जातीय द्वेषातून म्हशींच्या गाड्या अडवून पैशांची मागणी करतात. पैसे दिल्यानंतरच गाड्या सोडल्या जातात. हे प्रकार अवैध धंद्याला चालना देत आहेत. दुभत्या, गाभण म्हशींच्या गाड्या अडवणे हे अन्यायकारक आहे. या भीतीमुळे व्यापारी, गाड्या मालक, खरेदीदार सर्वच गोंधळले आहेत. घोडेगावसारखा शतकानुशतके चालत आलेला बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
बुधवार दि.३० जुलै रोजी घोडेगाव बाजारात व्यापारी असोसिएशन आणि कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासाचे सचिव देवदत्त पालवे व सोनई पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक विजय माळी यांना निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांना ईमेलद्वारे पाठवले गेले.लवकरच या निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी (अहिल्यानगर) यांना देखील दिली जाणार आहे.
बैठकीत व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अशोकराव येळवंडे, मजो पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, वसंतराव सोनवणे आणि अकिल अब्बास शेख यांनी आपली मते मांडली.
कायदेशीर कागदपत्र पूर्ण असतील तर कोणतीही कारवाई होणार नाही, असा स्पष्ट संदेश सहा.पोलिस निरीक्षक विजय माळी यांनी दिला. त्यांनी सांगितले की,जनावरे वाहतूक करताना वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, ट्रान्सपोर्ट परवाना आणि खरेदी-विक्री पावती आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र असल्यास कोणताही अधिकारी किंवा गोरक्षक जबरदस्ती करू शकत नाही.
दरम्यान, बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले की मार्केट कमिटीच्या अधिकृत पावत्या घेऊन गाडी भरल्यास त्या गाडीला अधिकृत पत्र देण्यात येईल, तसेच लवकरच एक हेल्पलाइन नंबरही उपलब्ध करून दिला जाईल.
यावेळी व्यापारी शिवा शिरसाठ, बाबासाहेब सोनवणे, रवींद्र बर्डे, शाम कदम, संजय चौधरी, जाकीर शेख, जाफर शेख, सुनील भवार, लखन बऱ्हाटे, प्रितेश येळवंडे, अनिस करीम शेख, रशीद पठाण, सईद गुलाम अहमद, कादिर चांद, सत्तार शेख, बाबू सय्यद, शेख मुनीर, कासिम शेख, अयाज शेख, महमद शब्बीर शेख, जावेद इनामदार, आवेश शेख, योगेश सोनवणे, गणेश सोनवणे, विष्णू चौधरी, अय्युब सय्यद, कय्युम शेख आदी उपस्थित होते.