नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुका भेंडा येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब मारुतराव नजन यांची ३३० मेट्रिक टन केळी इराण व रशिया देशांतील बाजारपेठेत निर्यात होत आहे.मोरया फ्रूट कंपनी व विवान फ्रूट कंपनी करमाळा यांचे मार्फ़त ही केळी
निर्यात होत आहे.त्यांच्या केळीला प्रति टन २५ हजार रुपये दर मिळाला.
शेती माल कसा पिकवायचा हे सांगण्यापेक्षा तो कसा विकायचा ते सांगा असा सवाल करणारे शेतकरी अधिक आहेत. पण नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी बाबासाहेब नजन हे वडील मारुतराव नजन व बंधु बापूसाहेब नजन यांचे मार्गदर्शनाखाली आपल्या शेतामध्ये विविध पिके घेतली आहेत. त्यात आले, पपई आणि केळी या पिकांचा समावेश आहे.त्यांच्या केळीची इराण व रशियाचे बाजारपेठांत विक्रीची संधी मिळाली आहे.
श्री.नजन यांनी ९ एकरामध्ये
६ फूट बाय ५ फूट अंतरावर
उतीसंवर्धीत केळी रोपांची लागवड केली. सेंद्रीय,रासायनिक खतांचा व पाण्याचा योग्य व नियंत्रित वापर करून झाडांची योग्य वाढ होते की नाही याकडे स्वत: लक्ष दिले. केळी घड बाहेर आला की त्या घडाची निगा राखणे, कमळ काढणे,आंतरप्रवाही औषधांचा वापर,जैविक खतांचा वापर, घडांचे रस शोषण करत असलेल्या किडीपासून संरक्षण करणे, बूरशी नाशक स्प्रे हि कामे केली. त्यामुळे एकरी ३५ ते ४० टनापर्यंत उत्पादन मिळाले. आज पर्यंत १२० टन केळी निर्यात झालेली आहे, तर अजुन २१० टन केळी निर्यात होत आहे.
रिलायन्स मॉलमध्ये पपई…
८ एकर क्षेत्रात पपईचे पिक घेतले असून पपई फळाची काढणी सूरु असून वाशी (मुंबई) येथील रिलायन्स मॉलला पपईचा पुरवठा केला जात आहे. या पपईला सध्या प्रतिकिलो २७ रुपये दर मिळत आहे.
–बाबासाहेब नजन
प्रगतशील शेतकरी,भेंडा