Wednesday, February 11, 2026

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे रब्बी ज्वारीचे दोन सुधारित वाण प्रसारीत

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

राहुरी

कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वाखाली संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठातील ज्वारी सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विजू अमोलिक आणि त्यांचे शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाने रब्बी ज्वारीचे एसपीव्ही २९१९ व एसपीव्ही २७५१ हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर निवड समितीकडून प्रसारीत करण्यात आले आहे.

रब्बी ज्वारीवर भाकृअप भारतीय श्री अन्न संशोधन संस्था, हैद्राबाद येथे नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील ज्वारी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कृषि शास्त्र विभागाचे उपमहासंचालक डॉ. डी. के. यादव यांच्यासह देशभरातील शास्त्रज्ञ उपस्थित होते. यावेळी हे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत करण्यात आले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित ज्वारी सुधार प्रकल्प हे राज्यातील रब्बी हंगामामधील ज्वारी संशोधनाचे प्रमुख केंद्र असून येथे ज्वारी पिकाचे संशोधन करुन त्यामधून जमीनीच्या प्रकारानुसार हलक्या, मध्यम व भारी जमीनीसाठी ज्वारीच्या उपपदार्थानुसार व कडबा गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिने नविन वाण विकसित केले जातात.

एसपीव्ही २९१९ हा वाण भारी जमीनीसाठी महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये जिरायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन २९.२६ क्विंटल प्रति हेक्टरी आणि कडब्याचे उत्पादन ८०.५८ क्विटंल प्रति हेक्टरी इतके आहे. हा वाण धान्य व कडबा उत्पादनामध्ये उत्कृष्ट असल्याचे निवड समितीच्या निष्कर्षास आले तसेच हा वाण रोग व कीडींसाठी प्रतिकारक आहे. त्याचप्रमाणे एस.पी. व्ही. २७५१ हा वाण हलक्या जमीनीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाचे हेक्टरी उत्पादन २३.०१ क्विटंल प्रति हेक्टरी आणि कडब्याचे उत्पादन ८८.८२ क्विंटल इतके आहे.

भारतीय अन्न संशोधन संस्था हैद्राबाद येथील संचालक डॉ. तारा सत्यवती व प्रकल्प निर्देशक डॉ. आर. मधुसुदन मधुसुदन यांचेही या वाणांच्या निर्मितीमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. यानिमित्त वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. व्ही. एल. अमोलिक यांनी प्रकल्पात कार्यरत असलेले सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. ज्वारी सुधार प्रकल्पाचे दोन वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारीत झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!