Saturday, August 30, 2025

राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा-प्रा.किसन चव्हाण

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने एका तरुण शेतकऱ्याचा खून केला, बळी घेतला आहे. खरं म्हणजे बाबासाहेब सरोदेची ही आत्महत्या नसून फडणवीस सरकारने केलेला खून आहे. म्हणून राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव व प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण यांनी केली.

नेवासा तालुक्यातील वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रा.किसन चव्हाण यांचे नेतृत्त्वाखाली रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१५ वाजता कुकाणा येथे बसस्थानक चौकात सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी प्रा.किसन चव्हाण बोलत होते.
श्री.चव्हाण पुढे म्हणाले की,राज्यातील फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी, सरकारचा धिक्कार व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि म्हणून बाबासाहेबांच्या कुटुंबावरती जे काही प्रसंग ओढवलेला आहे,त्या प्रति आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रस्त्यावरती उतरलो आहोत. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विरोधातले आहे. बहुजन, अल्पसंख्यांक, आदिवासींच्या विरोधातले सरकार आहे.निवडणुकित जाहीरनाम्यामध्ये व गावोगाव सभा घेऊन मत मागताना सांगितलं की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून,कर्जमुक्ती करू अशा पद्धतीचे फसवणारी घोषणा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांनी सातबारा कोरा केलाच नाही आणि कर्जमुक्ती ही केली नाही. सरकारला जाब विचारण्यासाठी एकत्रित आलो,आंदोलन केले तर अर्बन नक्षलवाद ठरवला जाईल आणि जेलमध्ये टाकले जाईल.
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या या सरकारच्या काळामध्ये झालेल्या आहेत.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच्या फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पडून आहेत, त्याला देखील त्रुटी लावलेल्या आहेत.वडुलेकरांनो गावात आंदोलन सुरू करा, संपुर्ण कर्जमाफी होईल पर्यंत आपण मागे हटणार नाही.

यावेळी बोलताना अड.देसाई देशमुख म्हणाले की,बाबासाहेब सरोदे यांच्या आत्महत्ये मुळे सरकारला याबद्दल निश्चितपणे विचार करण्याला भाग पडेल.आजच्या या रस्तारोको आंदोलनाची निश्चितपणे सरकार नोंद घेईल अशी मला आशा आहे.

काँग्रेसचे संभाजी माळवदे म्हणाले की,सध्याचा राजकारण हे खूप खालच्या पातळीवर घसरलेला आहे. आरोप प्रत्यारोप यामध्ये सर्वसामान्य गरीब माणूस, शेतकरी पिळून निघालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये रोज प्रत्येक दिवशी शेतकरी आत्महत्या होत आहे, परंतु राजकारण काय संपत नाही.राजकीय व्यक्तीला सर्वसामान्य बद्दल जे प्रेम पाहिजे, जी संवेदनशीलता पाहिजे ती आता राजकारणात उरलेली नाही.महायुती सरकारने दोन महिन्याच्या आत आम्ही सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करून हे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता पूर्ण झालं पाहिजे.संपूर्ण कर्जमाफी न केल्यास फसवणुकीचा गुन्हा देखील या शासनावर दाखल झाला पाहिजे.

शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक भदगले म्हणाले की, शेतकऱ्याची आत्महत्या हे सरकारचं अपयश आहे.शेतकरयांनी आत्महत्या करण्यापेक्षा ज्यांच्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली त्यांची हत्या करावी. सरसकट सातबारा कोरा केल्याशिवाय सरकारनं शेतकऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहू नये.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव, वंचीतचे नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, लहुजी सेनेचे नेते भैरवनाथ भारस्कर,शेतकरी संघटनेचे नेते अशोक काळे, बाबासाहेब खराडे संजय वाल्हेकर संदीप चाबुकस्वार विजय गायकवाड
शंकर भारस्कर, अशोक गर्जे आदींनी आपले मनोगत व्यक्त राज्य शासनाच्या सरकारी विरोधी धोरणांचा निषेध केला.
शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र कार्ले,बाबासाहेब आल्हाट नितीन गोरडे विनोद गोरडे जोसेपाल्लाट दीपक सरोदे, आकाश इंगळे,संदीप शिरसाट आदींसह विविध पक्षांचे व संघटनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

कुकाणा मंडलाधिकारी तृप्ती साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील,तलाठी अभिजीत क्षिरसागर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या रस्तारोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पोलीस निरीक्षक महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मनोज अहिरे, पो.कॉ. शहाजी आंधळे, बाबासाहेब वाघमोडे, वाल्मिक वाघ, संदीप ढाकणे, गणेश फाटक यांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली.

*निवेदनातील मागण्या….
१) सरोदे कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक मदत करावी.
२) महाराष्ट्र शासनावर सदस्य मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करावा.
३) निवडणुकीत दिलेले कर्जमाफी आश्वासन तत्काळ पूर्ण करावे.
४) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने स्वीकारावी.
५) जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी आत्महत्या शेतकऱ्याच्या दशक्रियाविधी पूर्वी सदर कुटुंबाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आर्थिक मदत करावी.

*रुग्णवाहिकेला दिली वाट…

कुकाणा येथे बसस्थानक चौकात रस्तारोको आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिका आल्याने आंदोलकांनी रस्त्यावरून उठून बाजूला होत रुग्णवाहिकेला वाट करून दिली. रुग्णवाहिका निघून जाताच आंदोलक पुन्हा रस्त्यावर बसले आणि आंदोलन पुढे सुरू ठेवले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!