संगमनेर
महाराष्ट्रातील जनतेने विश्वास दाखवून महायुतीचे सरकार निवडून दिले असून, हा विश्वास सार्थ करण्याचे काम आम्ही करत आहोत. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली. “लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संगमनेरातील जाणता राजा मैदान परिसरात रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी महायुतीचा महामेळावा पार पडला. या सभेत ते बोलत होते. मतदारांचे आभार मानण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आ. अमोल खताळ, आ.विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, बाळासाहेब पवार, शिवसेनेच्या नेत्या ज्योतीताई वाघमारे, शिवसेनेच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमदार खताळ हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत. खताळ यांनी सुचविलेली
सर्व कामे मार्गी लावण्यासाठी संबंधित मंत्रालयांना सूचना देण्यात येतील.”
वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत ते म्हणाले, “वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करू नये. हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही.” माजी मंत्री थोरात यांच्यावर टीका करताना ना. शिंदे म्हणाले, संगमनेरमध्ये साखर कारखाना, दूध संघ, सगळ्या संस्था यांच्याच, दूध पण माझे, चहा पण माझा, बिस्कीट पण माझे, मग जनतेचे काय? म्हणून तुम्ही आ. खताळ यांच्या रुपाने एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं. ४४० चा विरोधकांना झटका दिला,त्यातून ते अजूनही बाहेर आले नाहीत.
आमदार खताळ म्हणाले, “तालुक्यातील जनतेने ४० वर्षांची दादागिरी आणि पाण्यापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान सहन केले. निवडणुकीत जनतेने त्यांची मस्ती उतरवली.
शिवसेनेच्या नेत्या ज्योतीताई वाघमारे यांचेही भाषण झाले. विठ्ठल घोरपडे यांनी आभार मानले.
*शिंदेंची विरोधकांवर टीका…
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना “मत चोरीचा उपस्थित केलेला मुद्दा चुकीचा आहे, “असे म्हटले. ठाकरे शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला. “ऑपरेशन सिंदूरवर संशय व्यक्त करून काही जण पाकिस्तानची भाषा बोलत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
*विरोधकांनी आता खुळखुळा खेळावा…
शिंदे पुढे म्हणाले, “संगमनेरमध्ये भगवे वादळ उठले. तमाम लाडक्या बहिणींनी राज्यात चमत्कार घडवत महायुतीला बहुमत दिले. संगमनेरातील ४० वर्षाची मक्तेदारी मतदारांनी संपविली. आमदार खताळ यांना नावं ठेवणाऱ्यांच्या हातात जनतेने खुळखुळा दिला आहे. आता त्यांनी तो खुळखुळा खेळावा.