अहिल्यानगर/प्रतिनिधी
राज्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव कालावधीत देखावे,सांस्कृतिक कार्यक्रमातून शास्वत ग्रामविकास,वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, रेनवॉटर हार्वेस्टिंग,जल पुनर्भरण,पाणी बचत,जलसाक्षरता याबाबद जनजागृती करावी असे आवाहन निसर्ग मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले आहे.
जलमित्र श्री.फुलारी पुढे म्हणाले,राज्यातील काही जिल्ह्यामधील दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी हा चिंतेचा विषय बनलेला आहे. यावर्षी धरणे भरली असली तरी अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आणि गावात अद्याप ही समाधान कारक पाऊस झालेला नाही. सातत्याने कमी कमी होत जाणारे पर्जन्यमान, उपलब्ध पाण्याचा होणारा भरमसाठ उपसा यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनत आहे. जमीनीवर आणि जमिनीखाली उपलब्ध असलेले पाणी उपसण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. उपस्याच्या प्रमाणात भूजल पुनर्भरण ही काळाची गरज बनली आहे. यासाठी राज्य शासनाने यशदाचे मार्फत जल साक्षरता केंद्राची स्थापना केलेली आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जलसाक्षरता समित्या गठीत केलेल्या आहेत. जलनायक, जलयोद्धा,जलप्रेमी,जलसेवक,जलदूत,जलकर्मी यांचे मार्फत गावस्तरावर
पाण्याचा ताळेबंद तयार करणे, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करणे आणि समाजात जलसाक्षरता निर्माण केली जात आहे.
गणेशोत्सव कालावधीत गणपती आणि कार्यक्रम पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे जनतेमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व,मृद व जलसंधारण, प्लास्टीक मुक्ति व जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव कालावधीत देखावे,सांस्कृतिक कार्यक्रमातून वृक्ष संवर्धन, रेनवॉटर हार्वेस्टिंग,जल पुनर्भरण,पाणी बचत, जलसाक्षरता, प्लास्टिक मुक्ती,घन कचरा व्यवस्थापन, स्वच्छता अभियान,अटल भूजल योजना, कॅच दि रेन, जलजीवन मिशन,तसेच गाव विकासाच्या दृष्टीने
जलयुक्त गाव, स्वच्छ व हरित गाव
पायाभूत सुविधापूर्ण स्वयंपूर्णगाव,
सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव,सुशासन व प्रशासनयुक्त गाव,महिला विकासाला पूरक गाव,आरोग्यदायी गाव, बालविकासाला पूरक गाव व समृद्ध गाव या संकल्पनानांवर आधारित जनजागृती करावी असे आवाहन श्री.फुलारी यांनी केले आहे.