राहुल कोळसे:गुहा गावातील आदेश प्रतिष्ठानतर्फे गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ढंगात पार पडली. टाळ, मृदुंग आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.अहिल्यानगरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे व राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठेंगे यांनी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आदेश प्रतिष्ठानने टाळ-मृदुंग वादकांच्या गजरात मिरवणूक काढून एक सकारात्मक आदर्श निर्माण केला.
मिरवणुकीत गावातील पुरुष, महिला आणि लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विशेषतः भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांचा आणि मुलांचा उत्साह सर्वांचे लक्ष वेधून गेला. शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेली ही मिरवणूक गावात कौतुकाचा विषय ठरली आहे.गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आदेश प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम संयोजन आणि मेहनत घेतली. त्यांच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी व पोलिस प्रशासनाने कौतुक केले आहे.


