नेवासा/प्रतिनिधी
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बरोबरच विविध संघटनांकडून बुधवार दि.१० सप्टेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक -२०२४ मंजूर करण्यात आले. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर या विधेयकावर हरकती घेण्यात आल्या तर सदर हरकती या विधेयक रद्द करा अशा स्पष्ट होत्या. परंतु या हरकतीची दखल न घेता पाशवी बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करण्यात आले. विधिमंडळाच्या समितीने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. या विधेयकात बऱ्याच गोष्टी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत यात प्रामुख्याने शहरी नक्षलवाद याचा उल्लेख केला आहे या शब्दाच्या नावाखाली सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, सरकारी धोरणावर आवाज उठविणाऱ्या संघटना यांची गळचेपी, मुस्कटदाबी करण्यासाठी, जेरबंद करण्यासाठी हत्यार म्हणून वापर करणे शक्य होणार आहे. घटनेने भारतीय नागरिकांना जाब विचारण्याचा, टीका करण्याचा, सरकारी धोरणाची चिकित्सा करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. अनेक प्रश्नावर आवाज उठविणे, हक्कासाठी लढणे हे बेकायदेशीर ठरविले जाणार आहे. याच्या नावाखाली सरकार कोणत्याही संघटनेला सरकार बेकायदेशीर ठरवू शकते.या विधेयकामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या जुलमी कायद्या विरोधात आज राज्यभर महाविकास आघाडी व कम्युनिस्ट पक्षाकडून निदर्शने केली आहे.
यावेळी बोलताना कॉ. बाबा अरगडे यांनी हे विधेयक आणून लोकशाही संपविण्याचा घाट सरकारने घातला असा आरोप केला.
काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी हे विधेयक जनतेच्या सुरक्षेचे नसून सरकारने स्वतः च्या सुरक्षेसाठी आणलेले विधेयक आहे असा आरोप केला.
शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे यांनी हा कायदा नागरिकांच्या मूलभूत हक्काची गळचेपी करणारा असून तातडीने मागे घ्यावा असे मत मांडले.
काँग्रेसचे अंजुम पटेल यांनी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारला आता नेपाळ सारखी क्रांती करून हिसका दाखविण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले.
गणपत मोरे यांनी लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी या कायद्या विरोधात मोठी चळवळ उभारण्याचे आवाहन केले.
तसेच यावेळी कॉ. भारत अरगडे, शेतकरी संघटनेचे त्र्यंबक भदगले, बसपाचे हरीश चक्रनारायण, विजयसिंह गायकवाड, शंकर भारस्कर आदींनी आंदोलनास संबोधित केले.या आंदोलनात संजय वाघमारे,आप्पा वाबळे, लक्ष्मण कडू, बाबासाहेब सोनपुरे, भीमराज आगळे, कारभारी गायकवाड, भाऊसाहेब अरगडे, अशोक जाधव आदीसह नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी विधेयका विरोधात व सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करत नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.




