राहुल कोळसे:नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात -लवकर व्हावे यासाठी रस्ता कृती समितीने आज सकाळी राहुरी फॅक्टरी येथे केलेल्या रास्ता-रोको आंदोलनात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची देखील गाडी आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्गाने शिर्डीकडे जावे लागले. सुमारे तासभर झालेल्या या रस्ता रोकोने अनेकांची तारांबळ उडाली होती.
गेल्या अनेक वर्षापासून नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीचे काम खोळंबले आहे. हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार या रस्ते अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुरीकरांनी रस्ता कृती समितीच्या माध्यमातून आज बुधवारी सकाळी ११ वाजता राहुरी फॅक्टरी येथे नगर- मनमाड महामार्गावर तासभार रास्ता रोको आंदोलन छेडले. तासभर झालेल्या या रस्ता रोको आंदोलनाने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यातच कामानिमित्त जिल्हाधिकारी पंकज आशिया हे शिर्डीकडे जात असताना त्यांना देखील या रास्ता रोकोचा सामना करावा लागला.
ही गाडी पोलीस रास्ता रोकोतून काढून देत असताना अनेक आंदोलकांनी त्यावर आक्षेप घेत त्यांना देखील या भावना कळाल्या पाहिजेत म्हणून त्यांची देखील गाडी सोडू नका म्हणत हि गाडी अडवल्याने काही काळ चांगला तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी प्रसंंगावधान राखत पर्यायी मार्गाने हे गार्डी शिर्डीकडे रवाना केली. प्रसंगी अनेक आंदोलन करतांनी शासनावर रोष व्यक्त करत लवकरात लवकर या रस्त्याचे कामाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली.यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले.आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.


