अहिल्यानगर, दि. २६
जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच निर्देशानुसार ही सोडत प्रक्रिया पार पडत आहे.
अकोले पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले आहे. पंचायत समिती सभापती पदासाठी एकूण १३ पदे आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जाती (महिला)साठी १, अनुसूचित जमाती (महिला)साठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (महिला) २, सर्वसाधारणसाठी ३ आणि सर्वसाधारण (महिला)साठी ३ पदे आरक्षित आहेत.
नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.




