Sunday, October 26, 2025

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

शिर्डी/सुखदेव फुलारी

अहिल्यानगर जिल्ह्यातील ओढे-नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी शिर्डी येथे तातडीची बैठक घेतली. या बैठकीला साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेट्ये, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सायली पाटील, प्रदीप हापसे, स्वप्निल काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, राहाता तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, जलसंपदा व जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील पाणीसाठ्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी समन्वयातून कृती आराखडा तयार करावा. ओढे-नाले व चराई क्षेत्रांची व्यवस्थित मोजमाप करून अतिक्रमण हटविण्यात यावे.

पाथर्डी व शेवगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. जामखेड तालुक्यात ६० हेक्टर क्षेत्र व राहाता तालुक्यात अंदाजे ४० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असल्याने मनुष्यहानी कमी झाली आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, साई आश्रम अशा ठिकाणी पुरग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पुरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाने करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

शिर्डीत २०२० व २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीवरून धडा घेऊन मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कालच्या पावसात शिर्डीत कमी नुकसान झाले. नगरपालिका प्रशासनाने तत्परतेने मदतकार्य राबविले.

शिर्डी–लोणी महामार्गावरील बसस्थानकाजवळ असलेले गतीरोधक तात्काळ हटविण्यात यावेत. महावितरणच्या वीज वितरण पेट्या पाण्यात गेल्या तरी वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही. मात्र ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहात येत असतील तर तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी. कृषी व महसूल विभागाने सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
आरोग्यविषयक उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!