नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट व नागेबाबा परिवाराचे वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यात आल्याची माहिती नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टीमुळे विशेषता: शेतकरी, दुकानदार आणि गोरगरीब नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अन्नधान्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेकडो हेक्टर पिके वाहून गेली, अनेक मुकी जनावरे मृत्युमुखी पडली आणि अनेकांच्या घरात पाणी शिरून घर संसार, किराणा, किंमती वस्तू वाहून गेल्या आहेत, आणि म्हणूनच ..
अचानक कोसळलेल्या या संकटामुळे त्यांना मदतीची नितांत गरज आहे. नागेबाबा परिवार नेहमीच अशा अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे येत असतो. याच भावनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्था व नागेबाबा ग्रामीण पतसंस्था या दोन्ही संस्थेतील कर्मचारी वृंद व नागेबाबा परिवारातील इतर सहकारी या सर्वांच्या सहकार्यातून, तसेच मुख्यमंत्री महोदय यांच्या विनंतीला मान देऊन, आज नागेबाबा परिवाराच्या वतीने ४ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. सदर धनादेश अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक श्रीमान मंगेश सुरवसे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक निबंधक श्रीमती वाघमारे, गौतम देवळालीकर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ श्री.व्यवहारे, नागेबाबा मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, सरव्यवस्थापक भरत दारुंटे
यांचेसह नागेबाबा परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते.




