नेवासा/सुखदेव फुलारी
आध्यात्म सेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यामध्ये अग्रेसर असणारे गुरुवर्य ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशनकडे १ लाख रुपयांची देणगी सुपुर्त केली.
सामाजिक संघटना,समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन बळीराजाच्या पाठीशी शक्य ती मदत देऊन खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक,नेवासेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी राजा अस्मानी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली पीक शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेले. हे एवढ्या पुरते मर्यादित न राहाता राज्यातील वेगवेगळ्या नद्यांना आलेल्या पुरामुळे अक्षरशः शेती वाहून गेली. घरामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले. कधी नव्हे एवढे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला बळ देण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, वेगवेगळ्या मंदिर ट्रस्टच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे वतीने ही मदत निधी देण्यात आला.
*दानशूर मंडळींनी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे-उद्धवजी महाराज*
यावेळी उद्धव महाराज म्हणाले की, शेतकऱ्यांवर ओढवलेले हे अस्मानी संकट शब्दा पलीकडचे आहे. शेतकऱ्यांचे अक्षरशः संसार वाहून गेलेत, हे चित्र बघितलं की मन हेलावून जातं. आज राज्यातील सरकार, सेवाभावी संस्था शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. या पुण्य कार्यामध्ये सहभागी होऊन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा व श्री.वरदविनायक सेवाधाम,लोणीच्या वतीने १ लाख रुपयांची देणगी नाम फाउंडेशनकडे आम्ही सुपूर्द करत आहोत. वेगवेगळ्या सामाजिक संघटना,समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन बळीराजाच्या पाठीशी शक्य ती मदत देऊन खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक,नेवासेकर यांनी केले आहे.




