नेवासा/प्रतिनिधी
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासक म्हणून पदभार घेतल्यानंतर दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी समितीची निवड जाहीर केली आहे. उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. आज समितीमधील पाच सदस्यांनी मंदिर परिसरास भेट देऊन सर्व विभागांचे कामकाज पाहून घेतले.
समितीमध्ये तहसीलदार डॉ. संजय बिरादार (मुख्य उपकार्यकारी अधिकारी), नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे (व्यवस्थापक), घोडेगावचे मंडलाधिकारी विनायक गोरे (उपव्यवस्थापक), गणेश खेडकर (मुख्य लेखाधिकारी),राजकुमार पुंड (उप लेखाधिकारी) तर सदस्य म्हणून नेवासेचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, शनि शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, उपअभियंता विनायक पाटील, तलाठी सतीश पवार, ग्रामसेवक दादासाहेब बोरुडे यांचा समावेश आहे.
उपजिल्हाधिकारी चोरमारे यांनी बुधवारी दुपारी शनिशिंगणापूरला भेट देऊन दानपात्र, बर्फी प्रसाद विक्री, सीसीटीव्ही विभाग, तेल विक्री, देणगी विभाग, दर्शन व्यवस्था व चौथरा परिसरास भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. देवस्थानचे जी. के. दरंदले, लक्ष्मण वाघ, अनिल दरंदले व कायदेशीर सल्लागार अड. लक्ष्मण घावटे यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले.




