भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी विठ्ठल भानुदास खरड (वय ६५ वर्षे) यांचे दि.१३ नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार खरड कुटुंबियांनी कै.विठ्ठल यांचे नेत्र पुणे येथील एच.व्ही.देसाई हॉस्पिटलला तर मृतदेह लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टला दान केला.
श्रीक्षेत्र नाणीज येथील जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी त्यांच्या प्रत्येक प्रवचना मधून, ‘मरणानंतर देह मातीमोल होण्यापेक्षा त्याचा उपयोग वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, अर्थात भावी डॉक्टर्सना शरीर शास्त्र शिकण्यासाठी होऊ शकतो. गेल्यावर सुद्धा आपले नाव अजरामर होण्यासाठी आपण नेत्रदान,अवयव दान, देहदान करून समाजाच्या उपयोगी पडावे असे अवाहन
स्वस्वरूप संप्रदायाला केलेले आहे.त्यांच्याआवाहनाला साधकांनी मोठा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र भरातून लाखो साधकांनी मरणोत्तर देहदानाचे अर्ज भरून दिले होते.
जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या आवाहनानुसार संप्रदायाचे अनुयायी असलेले स्व.विठ्ठल खरड
यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करण्याचा संकल्प केला होता.त्यानुसार त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी कुठलाही मरणोत्तर धार्मिक विधी न करता त्यांची पत्नी सुलोचना, मुलगा सोमनाथ, मुलगी विजया, सून मुक्ता, जावई रामेश्वर, नातवंडे भक्ती, कोमल, काजल, प्रसाद, संकेत सिदार्थ या परिवाराने कै. खरड यांचे नेत्र व देह दान केले.
नेवासा येथील नेत्रदान चळवळीचे प्रणेते समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी भेंडा येथे येऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते नेत्रपटल एच.व्ही. देसाई हॉस्पिटल हडपसर(पुणे) येथे नेत्र रोपणासाठी पाठवण्यात आले. तर मृतदेह प्रवरा मेडिकल ट्रस्टला देण्यात आला.
आजच्या स्व. विठ्ठल भानुदास खरड यांच्या रूपाने १६८ वे देहदान व ८६ वे नेत्रदान असल्याचे या साधक वर्गाने सांगितले.स्वस्वरूप सांप्रदायाचे अध्यात्मिक प्रमुख दत्तात्रय उन्हाळे, नेवासा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोळसे, शेवगाव संतसंग अध्यक्ष अरविंद ठाणगे, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, किशोर मिसाळ,अशोक वायकर,डॉ.संतोष फुलारी व संप्रदायातील शेकडो भक्तगण यावेळी उपस्थित होते.


