नेवासा/प्रतिनिधी
पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू नयेत,त्यांना काय करायचं आहे याचा निर्णय त्यांनाच घेऊ द्यावा असे आवाहन डॉ. कारभारी नरवडे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील अजित रसाळ परिवाराचे वतीने राज्य लोकसेवा आयोगा मार्फत क्लास वन अधिकारी म्हणून निवड झालेल्या पुजा शिवाजी शिंदे व मंत्रालयात स्टेनोग्राफर म्हणून निवड झालेले किशोर विष्णू शिंदे तसेच फिजिओथेरपीस्ट म्हणून उत्तीर्ण झालेल्या डॉ. प्रेरणा काकासाहेब खराडे या गुणवंतांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरवडे बोलत होते.उद्योजक बापूसाहेब नजन, डॉ.शिवाजी शिंदे,पत्रकार सुखदेव फुलारी, डॉ.संतोष फुलारी,काकासाहेब खराडे,आबासाहेब काळे,संजय नवले, सुभाष चौधरी,सुनील गव्हाणे, अक्षय रसाळ, संदीप जावळे, देवराव खराडे, विष्णू शिंदे, ज्ञानदेव तुपे, सौ.अमृता रसाळ,अर्चना रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ.नरवडे पुढे म्हणाले की, निवड झालेल्या सर्वंच्या कठोर परिश्रमाला सलाम.स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपला बुद्धिमत्ता गुणांक(आयक्यू) बघूनच निर्णय घ्यावा, कष्ट करण्याची तयारी ठेवावी.पालकांनी आपल्या इछा मुलांवर लादू नये, त्यांना काय करायच याचा निर्णय त्यांनाच घेऊ द्यावा.स्पर्धा खूप मोठी आहे,त्यामुळे एकाच प्लॅनवर अवलंबून न राहाता दुसरा,तिसरा प्लॅन रेडी असावेत, एखादा प्लॅन फेल ठरला तर दुसरा तिसरा प्लॅन कामी येतो. देशाची,समाजाची सेवा घडावी,मान खाली घालावी लागेल असे काम करू नका.
डॉ.प्रेरणा खराडे म्हणाल्या की, आजचा माझा सन्मान हा माझ्या आई वडिलांच्या कष्टा मुळेच आहे.
किशोर शिंदे म्हणाले,अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण झाले, सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा होती, ती पूर्ण नाही झाली. आपल्या आई-वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकणे खूप महत्वाचे आहे.
पुजा शिंदे म्हणाल्या की,यूपीएससी व एमपीएससी या व्यतिरिक्त बरीच क्षेत्र आहेत की ज्यात आपण आपले करिअर करू शकतो,मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि आपल्या कुटुंबाची साथ असावी लागते. सर्वांनीच आयएएस किंवा आयपीएस व्हावे असे चुकीचे मोटिव्हेशन पालक आणि मुलांसमोर न ठेवता वेगवेगळे पर्याय ठेवले पाहिजेत. माझा हा चौथा प्रयत्न होता, तो खूप कठीण काळ होता,मात्र आई-वडील आणि भावाने मोलाची साथ दिली. स्पर्धेत टिकण्यासाठी ९९ टक्के कठीण परिश्रम असेल तर कुठे तरी १ टक्का नशिब आपल्याला साथ देत असते. सामाजिक भान म्हणून आपल्या आसपास कोणी मनापासून अभ्यास करत असेल तर त्याला मानसिक आधार द्यावा, त्याला मदत-सहकार्य करा.
डॉ.शिवाजी शिंदे, सौ.वैशाली खराडे, सौ.मिरा शिंदे,सौ.प्रियांका कातबने यांनी ही मनोगत व्यक्त केले.
राजेंद्र चिंधे यांनी प्रास्ताविक केले.संदीप फुलारी यांनी सूत्रसंचालन केले.अजित रसाळ यांनी आभार मानले.


