राहुरी :विचारभारती’ या एनजीओसाठी भाजपातील काही पदाधिकारी थेट पक्षपदाचा वापर करून वार्षिक वर्गणी स्वरूपात प्रति व्यक्ती १० हजार रुपये संकलित करत आहेत, असा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उदमले यांनी केला आहे. त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना लिहिलेल्या पत्राव्दारे विचारभारती या खासगी संस्थेच्या कार्यपध्दतीबाबत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आली आहे.
उदमले यांच्या मते, शहरासह जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते, समर्थक, नागरिक आणि महायुतीतील इतर पक्षांच्या इच्छुकांनाही या वर्गणीसाठी टार्गेट केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संस्थेचे वार्षिक उद्दिष्ट २५० ते ४०० वर्गणीदारांचे असून, २५ ते ३० लाख रुपये गोळा केले जात आहेत. भाजपा पदाधिकाऱ्यांना वर्गणी संकलनाची उद्दिष्टे दिली जात असून २ ते ३ हजार लोकांना टार्गेट केले जात आहे. या प्रक्रियेचा पक्ष कार्यावर थेट परिणाम होत असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व संभ्रम निर्माण झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की भाजपा मध्ये पद हवे असेल तर विचारभारतीशी संलग्न असणे आवश्यक आहे, असा कथित नॅरेटिव्ह जाणूनबुजून पसरवला जात आहे. विचारभारती संस्थेलाच पक्ष चालवत असल्याचे चित्र उभे केले जात आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे उदमले यांनी नमूद केले आहे. त्यांच्या मते, विचारभारतीचे पदाधिकारी उमेदवारी निश्चितीवर प्रभाव टाकणार असल्याचे वातावरण तयार केले जात आहे. संभाव्य उमेदवारांकडून वर्गणी मागितली जात असून, याचे स्वरूप उमेदवारीसाठी पैसे असे होत चालले आहे.
या गोष्टीमुळे पक्षाच्या प्रतिमेचे गंभीर नुकसान होत असून, लोकसभा निवडणुकीतही या परिस्थितीचा परिणाम झाल्याचा आरोप केला आहे. विचारभारतीशी संलग्न भाजप पदाधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी उदमले यांनी केली आहे.


