शिर्डी, दि. १३ मार्च
संपूर्ण विश्वाला पसायदान देणाऱ्या माउलींच्या विचारांचा सुगंध आजही जनमानसात दरवळत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘मोगरा फुलला’ या गणेश शिंदे यांच्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सहकारच्या पंढरीत झालेल्या सांगीतिक कार्यक्रमातून भक्तीसंगीत व ज्ञानेश्वरीतील निरूपणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा वारसा उलगडला गेला.
राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचे सप्तशताब्दी वर्ष सांस्कृतिक उपक्रमांनी साजरे केले जात आहे. प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात निरुपणकार गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित सर्व प्रसंगांचे वर्णन सांगून, त्यावर आधारित अभंगांचे सुमधुर गायन सन्मिता शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ, चेअरमन नंदूशेठ राठी, कैलास तांबे, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोणापुरे, संचालक प्रदीप दिघे, संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्य महेश खर्डे, प्राचार्य राम पवार, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपेगावच्या जन्मस्थानापासून ते आळंदी येथील समाधीस्थळावरील प्रसंगांचे भावस्पर्शी वर्णन गणेश शिंदे यांनी केले व ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विविध टप्पे रसिकांसमोर उलगडले.
ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नसून तो जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या जागतिक अशांततेच्या वातावरणात पसायदानाचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळेच पसायदानाची सुरुवातच “आता विश्वात्मक देवे” या शब्दाने होते याला खूप महत्त्व असल्याचे अभ्यासक गणेश शिंदे म्हणाले. सध्याच्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीवर नेमके भाष्य करतानाच संत ज्ञानेश्वरांच्या जयंतीचे ७५० वे वर्ष प्रत्येकाच्या घरापासून साजरे करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या निरूपणातून केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या गायिका सौ. सन्मिता शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेले. ‘अवघा रंग एक झाला’, ‘बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल’, अशी निरूपणावर आधारित बहारदार गाणी सादर करून त्यांनी रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली व वातावरणात चैतन्य निर्माण केले.
ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने अतिशय महत्त्वपूर्ण असा उपक्रम आयोजित करून राज्याची आध्यात्मिक, वारकरी व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गणेश शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. सन्मिता शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाची तयार केलेली संहिता प्रेरणादायी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.


