नेवासा/ प्रतिनिधी
विचारांचा संघर्ष हा आजचा नाही तर अनंत काळापासूनचा संघर्ष आहे.चिकित्सा करणे आणि जसे आहे तसे स्वीकारणे असे वाचनाचे दोन प्रकार आहेत. चूक आहे की बरोबर,खरे खोटे याची चिकित्सा करायला शिकले पाहिजे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कृतिशील उपक्रमातून कार्यकर्ता तयार करणारी आणि चिकित्सा करणारी वैचारिक संघटना असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कॉ.बाबा आरगडे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयात रविवार दि.९ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजता स्थापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना कॉ.आरगडे बोलत होते.सरपंच शरद आरगडे, अंनिसचे शोसल मीडिया जिल्हा कार्यवाह सुखदेव फुलारी,कृषि शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, रामकृष्ण नवले, नेवासा शाखा अध्यक्ष अप्पासाहेब वाबळे, उपाध्यक्ष बाळासाहेब आरगडे,
कार्याध्यक्ष भारत आरगडे, बुवाबाजीविरोधी संघर्ष विभाग प्रमुख बी.के.चव्हाण, व्यसन प्रबोधन विभाग प्रमुख सचिन चौधरी, महिला सहभाग विभाग प्रमुख रेणुका चौधरी, पुष्पा आरगडे, सचिन आरगडे,बाबासाहेब बोधक,गोरक्षनाथ बोधक, यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
स्थापना दिनाचे औचित्य साधुन अंनिसमध्ये ३७ वर्षाचे योगदान दिल्याबद्दल कॉ.बाबा आरगडे यांचा तर समितीचे जिल्हा पदाधिकारी सुखदेव फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
डॉ.ढगे म्हणाले,डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ९ ऑगस्ट १९८९ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली.अंनिस ही वैचारिक बैठक,वैचारिक बैठक असलेली चळवळ आहे. या संघटनेला सामाजिक कार्याची जोड आहे.
समाज प्रबोधन व लोकशिक्षणाचे कार्य करणाऱ्या या चळवळीत तरुण पीढी यावी यासाठी उपक्रम राबविले जावेत.
बाळासाहेबआरगडे,बी.के.चव्हाण,कॉ.अप्पासाहेब वाबळे,सरपंच शरद आरगडे,बाबा बोधक, सुखदेव फुलारी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कॉ.भारत आरगडे यांनी आभार मानले.


