अहिल्यानगर/प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही प्रबोधनाची चळवळ चालवणारी, पुरोगामी विचार मांडणारी,संत आणि समाज सुधारकांचा वारसा जपणारी संघटना असल्याचे प्रतिपादन अंनिसचे जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस अधिकारी बाबासाहेब बुधवंत यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट अंनिस स्थापना दिनानिमित्त जीवन प्राधिकरण कार्यालय तारकपूर येथे आयोजित कार्यक्रमात श्री. बुधवंत बोलत होते.
सेवा निवृत्त संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जोंधळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता व्ही. एम. कुलकर्णी, ए. टी. डफळ, रोहीदास थोरात यांचें सह बी. टी. सुरोशि,एन्. एस्. पठाण, अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, प्रधान सचिव विनायक सापा आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी विष्णू गायकवाड यांनी चळवळीचे गीत घेऊन, मान्यवरांच्या हस्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला गुलाब फुलं वाहून अभिवादन करण्यात आले.
श्री.बुधवंत पुढे म्हणाले की, समाजामधील वाढत्या भोंदूगिरीला आणि आधुनिक बुवाबाजीला पायबंद घालण्यासाठी तसेच अनेक अनिष्ट, अघोरी, अमानूष अंधश्रद्धेच्या बद्दल समाजात जनजागृती व्हावी म्हणून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी ९ ऑगस्ट १९८९ रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. आणि गेली ३७ वर्ष हे काम जोमाने चालू आहे. फक्त उणीव आहे ती आपल्या सहभागाची. आपणं सर्वांनी मिळून हे हातात हात घालून करूं या असे आवाहन त्यांनी केले.
विष्णू गायकवाड आणि विनायक सापा सर यांनी विविध चमत्काराचे प्रात्यक्षिके सादर करून त्यातील मर्म समजून देऊन उपस्थितांना चकीत केले.यावेळी अंनिसचे जात पंचायत जिल्हा कार्यवाह कारभारी गायकवाड, शहर प्रधान सचिव ठकाजी जगधने,शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब सुडके,शहर बुवाबाजी संघर्ष सचिव अनिता सापा,शहर महिला विभाग प्रमुख मेघा झावरे,शहर संविधान विभाग सचिव गौरी गुरव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र चौधरी, अविनाश कुलकर्णी, राजेंद्र सोनवणे, के.आर. झराड, बी. बी. भालेराव,डी बी अंबेटकर,आर. एस. गंगापूरकर, एस.व्ही. महादार यांनी परिश्रम घेतले.
विजय वांढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बी. एस.चव्हाण यांनी आभार मानले.


