नेवासा/प्रतिनिधी
नेवासा औद्योगिक क्षेत्रातील (पंढरीपुल एमआयडीसी) विविध मागण्यांकरीता शिंगवेतुकाई ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी(मऔविम) गणेश राठोड यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे,मात्र मागण्या पूर्ण झाल्यास २८ जून रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील पांडुरंग होंडे, राजेश सुरेशराव होंडे यांचेसह पंढरीपुल एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी नेवासा औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर २९ हा जाहिरात न देता खरेदी विक्री केली जाते. याठिकाणी मोठा प्रष्टाचार होत आहे त्याच्यावर कार्यवाही व्हावी, शासनाने इतर प्रकल्पांसाठी शेतक-यांना नुकसान भरपाई दिली. त्याप्रमाणे एकरी १० लाख मरणाई मिळावी,जमीनीस प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पांढरीपुल एम.आय.डी.सी. मध्ये आम्ही दिलेल्या जमीनीपैकी हेक्टरी २५ गुंठे व्यवसायासाठी मोफत जागा मिळावी,
प्रकल्पग्रस्त दाखले करीत मिळावेत,
जमिनी संपादित झालेल्या शेतकरी कुटुंबातील किमान एका सदस्याला पांढरीपुल एम.आय.डी.सी.मध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळावी, नुकसान भरपाईच्या रकमा व्याजासहीत मिळाव्यात, व्यवसायासाठी मोफत जागा न दिल्यास त्याबद्दल अतिरिक्त भरपाई मिळावी,प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या मुलांना शासकीय सेवेत आरक्षण मिळावे,प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मोफत व्हावे या ९ मागण्यांसह इतर विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहिल्यानगर येथील कार्यालय समोर दि.२७ मे पासून उपोषण सुरु केले होते.
उपोषण दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपोषणकर्ते व अधिकारी यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधला,त्यानंतर उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी(मऔविम) गणेश राठोड यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.मात्र मागण्या पूर्ण झाल्यास २८ जून रोजी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.