गुहा पत्रकार राहुल कोळसे: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सीबीएसई, गुहा येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या एलकेजी, यूकेजी तसेच इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.शाळेच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, फुगे, पेन, पेन्सिल तसेच विविध शालेय साहित्य भेट देऊन त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यासाठी जुन्या विद्यार्थ्यांनी विशेष तयारी केली होती. स्वागतगीत, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शाळा आनंदमय वातावरणाने फुलून गेली होती.

नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे विशेष नियोजन केले होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन करून प्रत्येक नवागत विद्यार्थ्याचे औक्षण केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयतेची भावना निर्माण झाली आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांना घरच्यासारखे वातावरण अनुभवायला मिळाले.यंदा एलकेजी वर्गामध्ये सुमारे ५५ ते ६० विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतला असून इतर वर्गांमध्येही ७५ पेक्षा अधिक नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. वाढत्या प्रवेशसंख्येमुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य पारखे सर, उपप्राचार्य सागर कडू सर, समन्वयक औदुंबर कडू, महिला समन्वयक सौ. दिपाली कडू, सौ. राजश्री भांड, सौ. शितल जाधव, सौ. जयश्री पागिरे, सौ. अलका कोळसे, सौ. सुजाता कोळसे, सौ. केतकी ईश्वरकर, सौ. स्वाती कदम, श्री. रवींद्र गागरे, श्री. सौरभ वरखडे, श्री. नामोयल रायता, श्री. विकास सौदागर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार आणि सचिव मनीषा शेलार यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. तसेच शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीस सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली आहे.


